Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

“देशाची दिशाभूल करणारा आणि जनतेची फसवणूक करणारा केंद्रीय अर्थसंकल्प – शेअर बाजारातील घसरण ही अपयशाची कबुली”:- ॲड. रोहिदास मुंडे

ठाणे:-  रविवारी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग आणि युवकांच्या अपेक्षांवर पूर्णतः पाणी फेरणारा असून हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची उघड फसवणूक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

 रविवारी अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीत झालेली मोठी पडझड ही या बजेटवर गुंतवणूकदारांचा व बाजाराचा विश्वास नसल्याचे स्पष्ट निदर्शक आहे. सरकार मोठमोठ्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात उद्योग, शेती, रोजगार निर्मिती आणि महागाई नियंत्रण या मूलभूत मुद्द्यांवर हा अर्थसंकल्प अपयशी ठरलेला आहे.

महागाईने सामान्य नागरिक आधीच हैराण झाला असताना इंधन दर, जीवनावश्यक वस्तू, शिक्षण व आरोग्य यावर कोणताही ठोस दिलासा या बजेटमध्ये देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ठोस तरतुदी अपेक्षित होत्या; मात्र त्या पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत. युवकांसाठी रोजगार निर्मितीबाबत ठोस योजना न देता केवळ आकड्यांचा खेळ मांडण्यात आला आहे.

हा अर्थसंकल्प देशाची खरी आर्थिक स्थिती झाकण्याचा प्रयत्न असून जनतेची दिशाभूल करणारा आहे. लोकांना गोंडस शब्दांत भूलथापा देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य माणसाच्या खिशावर भार टाकणारा आणि कॉर्पोरेट हितसंबंध जपणारा असा हा बजेट आहे.

केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली असून या फसव्याअर्थसंकल्पाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून जनतेचा आवाज बुलंद करेल. सरकारने तात्काळ या बजेटचा पुनर्विचार करून शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग आणि युवकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करावा, अशी ठाम मागणी ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |