Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गाव भेटी..


भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यात जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 ठाणे – राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सेलिब्रिटी भेटींचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानाच्या प्रचार व जनजागृतीसाठी अभिनेत्री शिवाली परब व अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांना भेट दिली. त्यानुसार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील डोहळे, शहापूर तालुक्यातील भावसे–खोस्ते तसेच मुरबाड तालुक्यातील खेवारे येथे सेलिब्रिटी भेटीचे कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी अभिनेत्री शिवाली परब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असून, प्रत्येक ग्रामस्थाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन गावाने बक्षिसे मिळवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, शासकीय विविध योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचारी वर्ग योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून ग्रामस्थांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले गाव समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून समृद्ध गावनिर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास आमदार दौलत भिका दरोडा, जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष (आप्पा) घरत, जिल्हा परिषद माजी सदस्य उल्हासभाऊ बांगर, माजी सभापती पंचायत समिती अनिल घरत प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) पंडित राठोड, गटविकास अधिकारी (भिवंडी) गोविंद खामकर, गटविकास अधिकारी (शहापूर) बी. एच. राठोड, गटविकास अधिकारी (मुरबाड) लता गायकवाड, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्य समन्वयक यास्मिन शेख, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भिवंडी तालुका – डोहळे ग्रुप ग्रामपंचायत भेट
यावेळी जिल्हा परिषद शाळा, डोहळे येथे भेट देऊन शाळेतील परसबाग व आवारामध्ये विकसित करण्यात आलेल्या बागेची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलांचे गृहप्रवेश करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

महिला बचत गटांमार्फत विविध वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, भाजीपाला तसेच रानमेव्याचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच डोहळे ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची चित्रफीत कार्यक्रमात सादर करण्यात आली.

ग्रामपंचायत भावसे–खोस्ते, तालुका शहापूर भेट
ग्रामपंचायत समाज हॉल येथे मान्यवरांचे औक्षण करून महिला बचत गटांमार्फत सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले कडधान्य पॉकेट, सन्मानचिन्ह व वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपारिक आदिवासी गौत्या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल शाळा व रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाचे उद्घाटन करण्यात आले. जलतारा व शोषखड्डा कामास भेट देण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रम, सिंचन विहीर व मोगरा लागवड प्रकल्पांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

ग्रामपंचायत खेवारे, तालुका मुरबाड
जिल्हा परिषद केंद्रशाळा खेवारे येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. गावात शोभायात्रा काढण्यात आली. महिला प्रेरणा संघाच्या सामूहिक परसबाग प्रकल्पास भेट देण्यात आली.

डास निर्मूलन हा नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच अनिष्ट रूढी निर्मूलन फलकाचे उद्घाटन करण्यात आले. कुलस्वामिनी मंदिरास भेट देऊन श्रमदानाद्वारे जलतारा, वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, वाचनालय, घरकुल प्रवेश तसेच ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |