वाढत्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करा - अॅड. रोहिदास बामा मुंडे
दिवा:- दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास बामा मुंडे यांनी केला आहे.
निवडणूक काळात व त्याआधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील 11 ते 15 अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या, ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र त्याच धर्तीवर दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत अॅड. मुंडे यांनी व्यक्त केले.
अॅड. रोहिदास मुंडे हे गेली अनेक वर्षे दिवा विभागातील अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने लढा देत असून, त्यांनी मागील महानगरपालिका आयुक्तांना तब्बल 110 अनधिकृत इमारतींचा छायाचित्रांसह अल्बम सादर केला होता, तरीसुद्धा आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, पाणी, ड्रेनेज, रस्ते, अग्निशमन यंत्रणा व इतर नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. यास सर्वस्वी प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या संदर्भात अॅड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत दिवा विभागातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे.
जर येत्या काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन दाद घेतली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
“कायद्याच्या राज्यात अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणे दुर्दैवी आहे. दिव्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असे ठाम मत अॅड. मुंडे यांनी व्यक्त केले.
