Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी

बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांचे भव्य-दिव्य, हृदयस्पर्शी स्वागत

झ्युरिक : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषा वसा घेऊन, भारताला विकासाच्या उत्तुंग वाटेवर घेऊन जाऊया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वित्झर्लंड झ्युरीक येथील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या स्वागताचा स्वीकार केला. येत्या काळात महाराष्ट्र भारतातील ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीचे राज्य म्हणून उदयास येईल. त्यामुळे विदेशात राहणाऱ्या मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अभिमान आणखी वृद्धिंगतच होईल, असा विश्वास व्यक्त करत, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या मराठी बांधवांचा विदेशातील महाराष्ट्राचे राजदूत असा गौरवाने उल्लेख केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी येताच त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या राज्यगीताने झ्युरीकचे सभागृह दुमदूमून गेले.

मराठी बांधवांचे कार्य महाराष्ट्राचा पासपोर्ट…!

ते म्हणाले की, पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तीनही गोष्टी बघायला मिळाल्याने. एक प्रकारे आपण परदेशात राहणारी मंडळी, महाराष्ट्राचे आणि मराठीचे राजदूत आहात. महाराष्ट्राची संस्कृती, आपली भाषा याचा परिणाम आणि प्रभाव तयार करता. मराठी बांधवांनी जगभरात नाव कमावले आहे. आपल्याकडे पाहून, अनेक देशात मराठी माणसाला सन्मान मिळतो. कारण आपल्या देशातील मराठी लोकांनी चांगलं काम केले आहे. त्या-त्या देशाच्या संस्कृतीमध्ये, व्यवसाय, उद्योग-व्यवसायामध्ये जे-जे योगदान दिले आहे, त्यामुळे आम्हालाही सन्मान मिळतो. या देशातील उद्योगांनाही आपल्याला भारतात कुठे जायचे आहे, तर भारतात जायचे असे वाटते. कारण मराठी माणूस अतिथ्यशील, स्वागतशील आणि उद्मशील आहे. मराठी माणूस मेहनती आहे. अशा पद्धतीने मराठी माणसाची प्रतिमा आपण निर्माण केली आहे. याच जोरावर यंदाही महाराष्ट्र दावोस मधील गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्राचा बोलबोला राहील…!

महाएनआरआय कनेक्ट..!

जगभरातील मराठी-भारतीय मंडळी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. त्यातील अनेक गोष्टी या अतिशय अर्थपूर्ण आणि अभिनव, परिवर्तनशील अशा आहेत. या सगळ्या गोष्टींचे अदान-प्रदान झाले पाहिजे. यासाठी बृहन्महाराष्ट्राशी म्हणजेच बृहद महाराष्ट्राशी संबंधित मराठी जन आहेत, त्यांचा कनेट जगातील अन्य मराठी बांधवाशी असला पाहिजे. त्यासाठी हे व्यासपीठ-प्लॅटफॉर्म महत्वपूर्ण ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा वसा-वारसा दिला आहे. या तीनही गोष्टींसाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला एकमेकांशी जोडेल. तो परस्परांतील संपर्क- समन्वय वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. यातून आपल्या सर्वांसाठी समृध्दीचा नवीन मार्ग खुला होईल.

सांस्कृतिक समृद्धी म्हणूनच महाराष्ट्र समृद्ध…!

मराठी भाषा अभिजात होती. पण तिला राज्यमान्यता मिळणे आवश्यक होते. ही राज्यमान्यता मिळवून देण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे उल्लेख करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपण विदेशातील मराठी बांधव मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता, मराठी भाषेच्या संपन्न-समृद्धीकरिता प्रय़त्न करत आहात, हे कौतुकास्पद आहे. भारताबाहेर आपण युरोपमध्ये मराठी शाळा चालवता. मुलांना मराठी भाषा शिकवता. भाषा या माध्यमामुळे आपण आपली संस्कृती, संस्कार, उत्सव, आपले साहित्य, कला यांच्याशी जोडलो जातो. भारतात महाराष्ट्र भौतिकदृष्ट्या समृद्ध, संपन्न तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध समजले जाते. महाराष्ट्राने केवळ भौतिक समृद्धी मिळविलेली नाही, तर तर सांस्कृतिक समृद्धी देखील मिळवलेली आहे. आपण सांस्कृतिक समृद्धी टिकवली म्हणूनच भौतिक दृष्ट्या समृद्ध ठरलो आहोत. यातूनच महाराष्ट्र हे येत्या तीन वर्षात भारतातील ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विदेशी थेट गुंतवणूक, स्टार्ट अपमध्ये, निर्यात, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे राज्य आहे. देशातील साठ टक्के डाटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. एआय आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांतही महाराष्ट्र सर्वात पुढे असल्याचा उल्लेख केला.

दरवर्षी बदललेली मुंबई…प्रत्येक शहरात विकास…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पायाभूत सुविधांची निर्मिती झाली, त्यामध्ये सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीत महाराष्ट्र पुढे आहे असा उल्लेख करून ते म्हणाले, मुंबईचा कायापालट करतो आहोत. पुढच्या काळात अजून काही महत्वाकांक्षी बदल होणार आहेत. दरवर्षी आपण मराठी मुंबईत परत याल, त्या प्रत्येक वर्षी मुंबई बदलेली दिसेल. २०३० मध्ये जगातल्या विकसित राष्ट्राच्या राजधानीच्या शहराहून उत्तम मुंबई पुढच्या पाच वर्षात तयार झालेली दिसेल. मुंबईच नव्हे, तर हे परिवर्तन पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरातही दिसेल. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण विकासाचा वेग पकडला आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही, या ध्येयवाक्य प्रमाणेच महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जाणार आहे. यात विदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांचेही महत्वाचे योगदान राहणार आहे.

स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही भेट घेत मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात ‘स्वागत देवाभाऊ’ असे फलक झळकले. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |