ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि वेसॅक इंडियाचा उपक्रम
ठाणे : ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि वेसॅक इंडिया (VesacIndia) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘2026- सुरक्षा आणि पर्यावरण वर्ष’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
रस्ते सुरक्षा सर्वांच्या दैनंदिन जीवनात अंगीकारली जावी आणि ती मानवी जीव वाचवणारा सकारात्मक ‘छंद’ म्हणून विकसित व्हावी, हा मोहिमेचा मुख्य संदेश उद्घाटन समारंभातून अधोरेखित करण्यात आला. यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या कार्यक्रमास वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेसॅक इंडियाचे संस्थापक व सुरक्षा-अभ्यासक विजयकुमार कट्टी, माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे तसेच ठाणे जिल्हयातील पत्रकार उपस्थित होते.
रस्ते सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात ‘15 चिन्हे - 15 कथा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. रस्ते वाहतूक संकेतांवरील 15 बोधकथांचे हे विशेष पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील हार्ड कॉपी, ई-कॉपी आणि ऑडिओबुक असे सर्व पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
‘R.E.A.C.H.’ Responsibility, Empathy, Awareness, Compassion संकल्पनेवर आधारित ७८ रस्ते सुरक्षा पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. ही सर्व डिझाईन्स प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाच्या मानकांनुसार तयार केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी रस्ता सुरक्षा ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगमर्यादा पाळणे, हेल्मेट व सीटबेल्टचा अनिवार्य वापर ही मूलभूत पण अत्यंत महत्त्वाची पावले असल्याचे त्यांनी सांगितले.वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांपेक्षा नियमांचे पालन करणारे नागरिक समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, यावर त्यांनी भर दिला.
शाळा–महाविद्यालयांमधील तरुण पिढीत रस्ता सुरक्षा संस्कार रुजविणे अत्यावश्यक असून, विद्यार्थ्यांचा सहभाग अपघातमुक्त समाज घडविण्यात निर्णायक ठरेल असे त्यांनी नमूद केले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर म्हणाले की, जिल्हा प्रशासनामार्फत दरवर्षी रस्ता सुरक्षा महिना साजरा केला जात असून अपघातमुक्त ठाणे जिल्हा हे प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे. प्रशासन, आरटीओ आणि संबंधित विभागांचे प्रयत्न लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा उपक्रम राबवला जात आहे. रस्ता सुरक्षा शिक्षणाची पायाभूत मुळे संस्कारक्षम वयातच रोवली गेली तर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय नसल्याने लोकांमध्ये या विषयाचे मूलभूत ज्ञान पुरेसे तयार झाले नाही. फक्त दंड व अंमलबजावणी वाढविण्यापेक्षा जागरूकता वाढविणे अधिक प्रभावी उपाय असल्याचे शासनाने ओळखले आहे, असेही श्री. काटकर म्हणाले.
कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला म्हणाले की, सामाजिक जाणिवेतून दरवर्षी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्याची श्री.विजयकुमार कट्टी यांची परंपरा आदर्श आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने टेरेस गार्डनमध्ये आकर्षक व विषयपर कार्यक्रम आयोजित झाल्याचे श्री. जालनावाला यांनी कौतुक केले.रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीची गरज आहे. भारतात दरवर्षी रस्ता अपघातातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय गंभीर असून, ते अनेक राष्ट्रीय संकटांपेक्षाही भीषण असल्याचे श्री.जालनावाला यांनी निदर्शनास आणले.
वेसॅक इंडियाचे संस्थापक व सुरक्षा-अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी टेरेस गार्डनच्या विकासातून मिळालेल्या यशाचा उल्लेख करत जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रस्ता सुरक्षेबाबतची प्राथमिक माहिती नसल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर चुका व अपघात होतात, म्हणून सुरुवातीपासूनच मुलांना रस्ता सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, अग्निसुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षा यांचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 2008 पासून त्यांनी रोड सेफ्टी क्षेत्रात 150-200 सेमिनार्स घेतल्याचा उल्लेख करून, सिग्नल्सची कथा स्वरूपात मांडणी करून सर्वसामान्यांना समजेल अशी अभिनव पद्धत वापरल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या ‘R.E.A.C.H.’ (Responsibility, Empathy, Awareness, Compassion, Harmony) या संकल्पनेनुसार जागरूकता निर्माण झाल्यास अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील, असेही ते म्हणाले. येत्या वर्षात जिल्हा माहिती कार्यालयासह रोड सेफ्टीसह औद्योगिक व फूड सेफ्टीवरील उपक्रम राबविण्याची घोषणा करत त्यांनी नागरिक आणि माध्यमांच्या सक्रिय सहकार्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास उपस्थितीत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. मान्यवरांशी संवाद साधून या मोहिमेच्या व्यापक जनजागृतीस हातभार लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
