ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून १ ते २८ व ३० ते ३३ प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा ४ जागांकरीता व प्रभाग क्र.२९ मध्ये अ,ब,क अशा ३ जागांकरीता मतदारांना मतदान करावयाचे आहे.निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांनी नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे.निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी.वेलरासू,मुख्य कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मुंबई व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार अध्यक्ष,जात पडताळणी समिती,जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूक विषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये १६,४९,८६९ इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये ८,६३,८७८ पुरुष व ७,८५, ८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत.निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरीता ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक,दिव्यांगासाठी व्हीलचेअर,ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय,पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत.मतदान केंद्रावरील कामकाजाकरीता मतदान केंद्राध्यक्ष,३ मतदान केंद्र अधिकारी व शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झाली असून २० टक्के राखीव असे मिळून एकूण १२,६५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहे.निवडणूकीकरिता कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आलेली आहे.सर्व मतदान यंत्रे सिलबंद करुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्रॉग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत.सर्व मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
प्रक्रियेवर वेबकास्टिंगव्दारे नियंत्रण:निवडणूक अधिकारी यांची कार्यालये,स्ट्राँग रूम,ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण,साहित्य वाटपाची ठिकाणे,संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे,मतमोजणीची ठिकाणे,मुख्य स्ट्रॉंग रुम, चेक पोस्ट आदीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरीता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण ६४८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणांवर कॅमेऱ्यांची नजर:
ठाणे महापालिकेच्या एकूण ११ विभागांमध्ये ४५ ठिकाणी एकूण ३०५ संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सखी व आदर्श मतदान केंद्र:ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ११ विभागनिहाय एक महिला सखी मतदान केंद्र (पिक बूथ) पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र करण्यात आले.सखी मतदान केंद्रावर नियुक्तअसलेले मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी १ ते ३,शिपाई व पोलीस सर्वच महिला असणार आहेत.
टपाली मतदान:निवडणूक कामी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करण्यात आली होती.या टपाली मतदानाला देखील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.निवडणुकीच्या कामकाजाकरिता क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना नेमून दिलेल्या भागातील मतदान केंद्रांवरील कामकाजावर त्यांचे बारकाईने लक्ष असणार आहे व ते त्याठिकाणी उद्भवणाऱ्यास अडचणी दूर करण्यासाठी आपल्या सहकारी समूहाच्या सहयोगाने दक्ष राहणार आहेत.मतदान यंत्राकरिता प्रशिक्षित मास्टर ट्रेनर कार्यरत असणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर व शहरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज आहेत. मतदान साहित्याचे वितरण व संकलन कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वृंद ठेवण्यात आला असून मतमोजणीसाठीही आवश्यक कर्मचाऱ्यांची प्रभागसमितीनिहाय नेमणूक करण्यात आली आहे व त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पारदर्शक,निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका सज्ज असून प्रत्येक टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आलीआहे.दि.१३ जानेवारी २०२६ रोजी प्रचार संपला असून त्यानंतर सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही व्यक्तीस उमेदवारास,राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही,याची नोंद घ्यावयाची असून आचार संहिता पथकाने याबाबत अधिक दक्ष रहावे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत व नागरिकांनाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी ठाणेकरांनी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदानास हक्क बजावावा,असे आवाहन देखील महापालिका आयुक्तांनी केले आहे.
