डोंबिवली ( शंकर जाधव ) : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध उमेदवारांच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, कल्याण पूर्वेत एका घराबाहेर लागलेल्या ‘पुणेरी टाईप’ पाटीन मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पाटीवरील मजकूर इतका स्पष्ट, तिरकस आणि थेट आहे की, काही राजकीय उमेदवारांचा हिरमोड झाला असताना काहींच्या मात्र चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
पुणेरी पाट्यांची खासियत म्हणजे — कोणताही मुलाहिजा न बाळगता नेमक्या शब्दांत दिलेला संदेश. फेरीवाले असोत, पत्ता विचारणारे असोत किंवा कुणीही अनावश्यक त्रास देणारे असोत, पुणेरी पाट्या आपले काम चोखपणे बजावतात. हाच पुणेरी बाणा आता थेट **राजकारणात** उतरल्याचे चित्र कल्याण पूर्वेत पाहायला मिळत आहे.
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 12 मधील एका इमारतीतील घराबाहेर ही पाटी लावण्यात आली आहे. या पाटीवर लिहिले आहे —
> “दारावरची बेल वाजवून त्रास देऊ नका.
> आमच्या घरातलेच नाही, तर अख्ख्या बिल्डिंगचे वोट फक्त ‘Sachin Pote’ यांनाच!”
इतक्यावरच न थांबता, पाटीवर शिवसेना ची निवडणूक निशाणी धनुष्यबाण ही ठळकपणे रेखाटण्यात आली आहे. त्यामुळे हा संदेश कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही, हे अगदी स्पष्ट होते.
या पाटीची खास गोष्ट म्हणजे — याच पॅनलमधून सचिन पोटे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या एका राजकीय उमेदवाराच्या नजरेस ही पाटी पडली. मात्र, राजकीय वैर बाजूला ठेवत त्याने खिलाडूवृत्ती दाखवली. आणि या ‘पुणेरी टाईप’ पाटीचा फोटो काढून तो थेट सचिन पोटे यांनाच पाठवला. या प्रतिस्पर्ध्यानेही या कल्पकतेला दिलेली दाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
