संतोष कदम व सोनम ट्रान्सपोर्ट यांच्याकडुन होत आहे स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना त्रास.
पोलीस प्रशासना सोबत बैठक लावून समस्या सोडविण्याचे भावनाताई घाणेकर यांचे आश्वासन.
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे ) : ट्रान्सपोर्ट मालक संतोष कदम, सोनम ट्रान्सपोर्ट यांच्या तर्फे उरण तालुक्यातील स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना विविध त्रास देण्यात येत असून यामुळे उरण मधील स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या महत्वाच्या समस्या कडे पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने व स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांवर सातत्याने अन्याय होत असल्यामुळे स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांची नवघर येथे बैठक संपन्न झाली.
नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरण यांच्या वर होणाऱ्या अन्याया बाबत व विविध समस्या वर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरण यांच्या माध्यमातून नवघर येथील टेम्पो ऑफिसमध्ये एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी विशेष उपस्थिती लावून सर्व मालकांच्या समस्या जाणून घेतल्या.स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना कामधंद्यात रोजगारात प्राधान्य मिळावे, संतोष कदम व सोनम ट्रान्सपोर्ट कडुन होणारा अन्याय दूर करून न्याय मिळावा,बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय ट्रान्सपोर्ट मालकाकडुन होणारा त्रास कमी व्हावा, पोलीस प्रशासनाने स्थानिक ट्रान्सपोर्ट मालका बरोबर सहकार्याची भूमिका ठेऊन स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांना न्याय द्यावा, स्थानिक ट्रान्सपोर्ट मालकांवर होणारा विविध अन्याय,समस्याचे त्वरित निराकरण करावे आदी मागण्या ट्रान्सपोर्ट मालकांकडुन यावेळी करण्यात आले.अध्यक्ष प्रदीप भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेला ग्रामपंचायत नवघरच्या उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, माजी सरपंच संगीता प्रदीप भोईर, योगिता योगेश तांडेल, शालिनी गणेश वाजेकर, निशा सुरेश भोईर, नवघर ट्रक टेम्पो वाहतूक सहकारी संस्था मर्यादित जीडीएल उरणचे अध्यक्ष प्रदीप भोईर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, खजिनदार राजेश पाटील, सेक्रेटरी समाधान तांडेल तसेच टेम्पो युनियनचे सर्व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या हितासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.पोलीस प्रशासनासोबत बैठक लावून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी टेम्पो मालक व संघटनेचे समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
