ठाणे : लग्न ही केवळ सामाजिक परंपरा नसून दोन व्यक्तींच्या आयुष्याला दिशा देणारी आहे. या जाणिवेतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यांच्या वतीने ‘ जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर शिवाजी टेक्निकल स्कूल, पंतनगर, घाटकोपर येथे संवादशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव विजय परब,आरती नाईक, मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत तसेच घाटकोपर शाखेचे अध्यक्ष केतन शहा यांची प्रमुख उपस्थित होते .
हा उपक्रम जरी लग्नाळू तरुण-तरुणींसाठी उपयुक्त वाटत असला, तरी तो केवळ त्यांच्यापुरता मर्यादित न राहता लग्न या विषयाशी निगडित असलेल्या विवाहित जोडपी तसेच पालकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत लग्नसंस्थेचे बदलते आयाम, नात्यांमधील अपेक्षा व वास्तव यांचा समतोल कसा साधावा, यावर या संवादशाळेत मोकळा व सखोल संवाद घडवण्यात आला.
पारंपरिक व्याख्यानांच्या चौकटीत न अडकता, खेळ, व्हिडिओ सादरीकरणे व वास्तवाधारित केस स्टडी यांच्या माध्यमातून सहजीवन, नातेसंबंधातील संवाद, गैरसमज,आवश्यक-अनावश्यक बाबी आणि संभाव्य आव्हाने यांचा प्रभावी उलगडा करण्यात आला.
हा उपक्रम आजही समाजाला विचार करायला भाग पाडणारा ठरत आहे.‘विवेकी जोडीदार निवड’ आणि ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या दोन वाक्यांतील शब्दांची अदलाबदल अर्थ कसा बदलते, आणि नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारायचा हे प्रत्येकाने आपल्या समज, स्वभाव, कुटुंब आणि सामाजिक जाणीवांच्या आधारे ठरवावे, असा महत्त्वाचा संदेश या संवादशाळेतून देण्यात आला.
विचारप्रवर्तक आणि समाजाभिमुख उपक्रमाची, समाजाला नितांत गरज असल्याचे उपस्थित नागरिकांनी मत व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्या कुटुंबात व नातेसंबंधांमध्ये विवेकी संवादाची सुरुवात करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
ठाणे, मुंबईतील विविध भागांतून आलेले वेगवेगळ्या वयोगटांतील लग्नाळू तरुण-तरुणी, विवाहित जोडपी आणि पालक उपस्थित होते.
या उपक्रमासाठी घाटकोपर शाखेचे कार्याध्यक्ष शहाजी पाटोदेकर, प्रधान सचिव प्रफुल रणदिवे, संदेश खळे, कैलास बद्रीके, निर्मला माने, संदेश बालगुडे, प्रियांका सावखांडे, अनंत जोशी, अरुण सातव, छाया धनवे तसेच इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
