ठाणे, दि. १२ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत RSETI योजनेच्या माध्यमातून आज, दि. १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी कल्याण येथे कौशल्य मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा मेळावा महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) ठाणे व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) योजना ही केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना असून ग्रामीण भागातील १८ ते ५० वयोगटातील युवक-युवतींसाठी १० ते ४५ दिवसांचे मोफत निवासी व अनिवासी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. या अंतर्गत सुमारे ६४ प्रकारची मान्यताप्राप्त स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. यात शेतीविषयक उद्योजकता, प्रक्रिया उद्योग, उत्पादन आधारित उद्योग तसेच सामान्य उद्योजकता विकास यांसारख्या विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे.
या कौशल्य मेळाव्याद्वारे RSETI योजनेची माहिती, विविध शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, बँक कर्ज योजना व उद्योजकता विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित युवक-युवतींनी विविध स्टॉल्सना भेट देत नोंदणी करून योजनांची माहिती घेतली.
यावेळी प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांनी युवकांना कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून देत स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी RSETI, MSRLM व कौशल्य विकास योजनांची माहिती सादर केली. तसेच अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी विविध बँक कर्ज योजनांबाबत मार्गदर्शन करत अधिकाधिक युवकांनी प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन केले. राज्य संचालक जयानंद भारती यांनी विविध कौशल्य उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
या मेळाव्यास मोठ्या संख्येने युवक-युवती, महिला बचतगट सदस्य, प्रशिक्षणार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक ठाणे आशिष लोहकरे यांनी केले तर प्रशिक्षक ठाणे सेहल खंडागळे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष लोहकरे, जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) प्रतिक्षा आगिवले, उमेद अभियान तालुका व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच RSETI संस्थेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कौशल्य मेळावा युवक-युवतींना रोजगाराभिमुख दिशा देणारा ठरला असून स्वयंरोजगार व उद्योजकता विकासासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यश आले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
