आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून उपक्रम
ठाणे, दि.13 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुरबाड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळांना संगणकांचे वाटप करण्यात आले. आयडीबीआय बँक लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार कार्यालय, मुरबाड येथे आयोजित कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते संगणकांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली, एकलहरे, मिल्हे, चासोळे, बळेगाव-उमरोली, कळंभाड, प्रधानपाडा आणि फांगळोशी येथील एकूण आठ जिल्हा परिषद शाळांना संगणक प्रदान करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी आयडीबीआय बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर आमदारांनी तहसीलदार कार्यालय, मुरबाड येथे भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. कार्यालय परिसरातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सातत्याने लोकाभिमुख सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शासकीय इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे यांना देण्यात आल्या.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी (कल्याण) विश्वास गुजर, तहसीलदार (मुरबाड) अभिजीत देशमुख, IDBI Bank चे मुख्य शाखा व्यवस्थापक श्री. गायकवाड, अनिल घरत तसेच विविध मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.
