Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना कठोर शिक्षा करा.. जनवादी महिला संघटनेची मागणी

उरण दि २५ ( विठ्ठल ममताबादे ) : अशोक खरात या स्वयंघोषित भोंदू बाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत आणि ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत. अस्थिर आणि बेभरवशाची राजकीय कारकीर्द, त्यातून सतत असलेली असुरक्षिततेची भावना यामुळे असल्या बाबा, बुवांच्या नादी लागणारे मोठमोठे राजकीय पुढारी आपल्याला नवीन नाहीत, अगदी चंद्रा स्वामी, सत्य साईबाबा यांच्यापासून ही यादी सुरू होते. प्रसिद्धी, फायदे यातून असल्या ढोंगी बाबांचे प्रस्थ वाढत जाते. त्याला सामान्य जनता, (त्यातही महिला), जी कायमच विविध चिंतांनी ग्रस्त असते, ती साहजिकपणे बळी पडते. आणि मग पैसा, प्रसिद्धी, सत्ताधाऱ्यांना बोटावर नाचवण्याची ‘सिद्धी’ प्राप्त झालेली ही तथाकथित साधू मंडळी हतबल महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवतात. अशोक खरात सारखी अनेक प्रकरणे अगदी पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणाऱ्या राज्यात, महाराष्ट्रातही घडली आहेत, घडत आहेत.

नाशिकच्या या बाबाने राज्यभरातील हजारो लोकांची आर्थिक लूट केली, त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यात गुंतावे हे संपूर्ण राज्याला लांछनास्पद आणि त्यातील महिलांना शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. या संपूर्ण प्रकरणाची एकूण व्याप्ती पाहता रूपाली चाकणकर या त्या हिमनगाचे केवळ टोक आहे. त्यात अनेक मोठे प्रभावशाली राजकीय नेते गुंतलेले आहेत, हे उघड आहे. त्याशिवाय इतकी माया जमा करणे, श्रीमंत ग्राहकांना, त्यातही महिलांना वश करणे आणि अनेक वर्षे हे उद्योग सहजपणे सुरू ठेवणे अशक्य आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्याची, महिला आयोगाची आणि एकूणच आपल्या विवेकीपणाची जी नाचक्की झाली, त्याने राज्यभरातील महिला अतिशय संतप्त आणि अस्वस्थ झाल्या आहेत. मात्र यापूर्वी घडलेल्या आसराम, राम-रहीम असल्या बाबांच्या बाबतीत जे झाले, गुन्हे सिद्ध होऊनही त्यांचे आश्रम सुखेनैव सुरू राहिले, हे बाबाही सतत जामिनावर बाहेर येत राहिले, असे न होता अशोक खरातला तर कडक शिक्षा झालीच पाहिजे, पण समाजात वावरत असलेल्या इतर बाबांना त्यामुळे आपले उद्योग थांबवण्याचा कडक संदेश गेला पाहिजे. त्यासाठी जनवादी महिला संघटनेने पुढील ठोस मागण्या केल्या आहेत

१. या संपूर्ण प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी करून यातील सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी.

२. अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.

३. पीडित नागरिकांना तात्काळ न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.

४. या प्रकरणाच्या बळी पडलेल्या महिलांना अभय देऊन बोलते करावे.

५. या प्रकरणात प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या प्रत्येक राजकीय, प्रशासकीय वा सामाजिक पुढाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

६. ही कारवाई लैंगिक व आर्थिक शोषण, फसवणूक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या सर्व कायद्यांच्या अंतर्गत करण्यात यावी.

आज देशात आणि राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना मूठमाती मिळून धर्मांधता आणि त्यातून येणारे अज्ञान, बुवाबाजी आणि अंधभक्ती वाढीला लागली आहे. हे समाजाचे अपयश तर आहेच, पण सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चुकीच्या मूल्यांना खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीचे ते फलित आहे. त्यामुळेच या प्रकरणात जर आरोपींना वाचवण्याचे, चौकशीत त्रुटी ठेवण्याचे, दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले, तर जनवादी महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा निवेदनामार्फत संघटनेचे पदाधिकारी नसिमा शेख, प्राची हातिवलेकर, रेखा देशपांडे यांनी प्रशासनाला दिला आहे.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील,अध्यक्ष सविता पाटील, सेक्रेटरी धनवंती भगत, खजिनदार लता पाटील, सहसचिव कुंदा पाटील,सदस्या उषाताई म्हात्रे, नयना म्हात्रे,गिता पाटील, गुलाब टावरी यांनीही सदर घटनेचा निषेध करत आरोपी व दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |