Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

सरस विक्री प्रदर्शनात’ ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची विक्रमी कामगिरी; ५१.१७ लाखांची विक्री; १२ हजारांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनाला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ५१.१७ लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनात उत्तम कामगिरी करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मान दि. १६ मार्च, २०२६ रोजी बी.जे. हायस्कुल, ठाणे येथे करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी महोत्सवाअंतर्गत हे प्रदर्शन दि. १० ते १४ मार्च २०२६ दरम्यान यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण (प) येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनामध्ये स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, वस्त्रनिर्मिती उत्पादने आणि घरगुती वापराच्या वस्तूंचे एकूण १०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये १० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच ९० हस्तकला, कपडे व घरगुती वस्तूंचे स्टॉल्स समाविष्ट होते. या प्रदर्शनात २१० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

या प्रदर्शनास कल्याण, ठाणे तसेच इतर जिल्ह्यांमधील सुमारे १२,००० नागरिकांनी भेट दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिलांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अनेक स्वयं सहाय्यता समूहांना प्रदर्शनादरम्यान इतर ग्राहकांकडून पुढील ऑर्डर्सही प्राप्त झाल्या, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायवृद्धीस नवे दालन खुले झाले आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की, “ग्रामीण महिलांनी अत्यंत गुणवत्ता व कल्पकतेने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. भविष्यातही अशा अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अजिंक्य पवार म्हणाले की, “सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. ५१.१७ लाख रुपयांची विक्री ही महिलांच्या मेहनतीची आणि गुणवत्तेची साक्ष आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ बाजारपेठच नव्हे तर व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्गही उपलब्ध झाले आहेत. पुढील काळात अशा प्रदर्शनांचे अधिक प्रभावी नियोजन करून महिलांना अधिक संधी देण्यात येतील.”

या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी, उत्पादनांची गुणवत्ता सादर करण्याची संधी आणि डिजिटल तसेच प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. यामुळे महिला बचत गटांचे सक्षमीकरण अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असून त्यातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |