खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना मोठे यश…
डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निळजे गांव येथे रेल्वे लाईनमुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर मोठी सकारात्मक घडामोड झाली असून स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेले बे-मुदत आंदोलन यशस्वी ठरले आहे. खासदार डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने, रेल्वे प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेत अंडरपास मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे .
दिनांक ३०/०३/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कल्याण ग्रामीण विधासभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासमवेत रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निळजे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे मान्य करत कामाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. या बैठकीनंतर रेल्वे प्रशासनाने आ. राजेश मोरे यांना दिलेले लेखी पत्र निळजे येथे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांना दिनांक ३१/०३/२६ रोजी देण्यात आले.
या लेखी आश्वासनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून “जीव मुठीत घेऊन प्रवास कधीपर्यंत?” या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. रेल्वे प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती आ. राजेश मोरे यांच्यामार्फत करण्यात आली असता आंदोलनकर्त्यांनी एकमताने आंदोलन मागे घेतले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर मार्ग मोकळा होण्याच्या दिशेने मोठी प्रगती झाली असून लवकरच अंडरपासचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, असा विश्वास आ. राजेश मोरे यांनी व्यक्त केला .
स्थानिक नागरिकांनी केलेल्या एकजुटीच्या आंदोलनामुळे प्रशासनाला सकारात्मक भूमिका घ्यावी लागली असून निळजे येथील नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा मार्ग आता मोकळा होण्याच्या मार्गावर आहे.
यावेळी आ. राजेश मोरे , श्री. सुभाष पाटील, श्री. प्रकाश पाटील, श्री. गजानन पाटील तसेच निळजे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यक होते. असेही आ. राजेश मोरे म्हणाले .
