ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य सावरकर प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 19 बेवारस वाहने जप्त करण्यात आली तसेच फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले.
लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रभागात रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेली बेवारस वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या. सदरची कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे,पोलीस विभाग, वाहतूक विभाग व ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
आज लोकमान्य सावरकर प्रभाग समितीतील महात्मा फुले नगर, कोरस रोड, वेदांत कॉम्प्लेक्स समोरील रस्ता, यशोधन नगर, लोकमान्य बस डेपो पसिरातील अतिक्रमण व बेवासरस वाहनांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली. या कारवाईत चार चाकी 04, तीन चाकी 03 व दुचाकी 12 अशी एकूण वाहने बाटा कंपाऊंडमध्ये जप्त करण्यात आली. यासोबतच परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. तसेच 3 व 4 एप्रिल 2026 या दोन दिवशी 16 बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मार्च महिन्यात प्रभाग समिती अंतर्गत एकूण 32 बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या मोहिमेमुळे वाहतूक सुलभ होण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यास मदत होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
