साहित्य भारती कोकण प्रांत व नवी मुंबई साहित्य परिषदेचा स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई : साहित्य भारती कोकण प्रांत व अप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद, वाशी यांच्या वतीने आयोजित 'चैत्रमास' मासिक कार्यक्रमात 'चैत्र पालवी' या विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. वाशी येथील या सोहळ्याला साहित्यिक आणि रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या कवयित्री आणि प्रसिद्ध निवेदिका माधुरी बागडे तसेच साहित्य भारती कोकण प्रांताचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पा जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी आणि साहित्य भारती कोकण प्रांताच्या उपाध्यक्ष डॉ. अरुंधती जोशी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राधा गानू यांच्या सुमधुर 'सरस्वती वंदने'ने झाली. त्यानंतर कल्पना देशमुख आणि रश्मी राऊत यांनी भावगीत सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. मिलिंद कल्याणकर यांनी 'मैत्री' ही कविता सादर करून दाद मिळविली.क्षमा वखारकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.अरुंधती जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा मांडली तसेच साहित्य भारती कोकण प्रांत व अप्पा जोशी प्रतिष्ठानच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली.
प्रमुख पाहुण्या माधुरी बागडे यांनी आपल्या मनोगतात कवितेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक काळापर्यंत कवितेने घेतलेली वळणे आणि दिग्गज कवींचे साहित्य क्षेत्रातील योगदान यांचा ऐतिहासिक आढावा त्यांनी घेतला. तसेच, नवी मुंबई साहित्य परिषदेच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
साहित्य भारतीचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी नवोदित साहित्यिक आणि कवींना मार्गदर्शन करताना सांगितले की, "नवोदित लेखकांनी सामाजिक समस्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्या विषयांना आपल्या साहित्यात प्राधान्य द्यावे. साहित्यातून समाज प्रबोधन करून देशकार्यात मोलाचे योगदान द्यावे," असे आवाहन त्यांनी केले.
विशेष अंकाचे स्वागत
यावेळी 'चैत्र पालवी' या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अंकाविषयी स्मिता वाजेकर यांनी मोजक्या आणि प्रभावी शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन डॉ. नंदकिशोर जोशी व डॉ. अरुंधती जोशी यांनी केले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिषदेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संतोष जाधव यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर कल्पना देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
