Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मोठे देसाई गावात हनुमान जन्मोत्सवाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न; ५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा !

ठाणे / मोठे देसाई ( विनोद वास्कर ) : ठाणे जिल्ह्यातील मोठे देसाई गावात यावर्षीचा हनुमान जन्मोत्सव अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मंदिराच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण ग्रामस्थांनी ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ म्हणून हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा केला.

५० वर्षांचा गौरवशाली इतिहास

सन १९७६ मध्ये या हनुमान मंदिराची स्थापना आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन सरपंच चंद्रकांत पाटील, माजी सरपंच सावळाराम देवकर, पंचायत समिती सदस्य बाळाराम कान्हा पाटील आणि समस्त ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जयपूर येथून हनुमंतरायाची भव्य मूर्ती आणली होती. त्या ऐतिहासिक घटनेला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी एकाच रंगाचे वस्त्र परिधान करून ऐक्याचे दर्शन घडवले.

भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाची सुरुवात सत्यनारायणाच्या महापूजेने झाली. त्यानंतर पडले आणि डायघर येथील संयुक्त हरिपाठ मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकाळी लालचंद महाराज (तळोजे) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले, ज्यासाठी मोठे देसाई आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

दुसऱ्या दिवशी दुपारी प्रवचन आणि सायंकाळी पाटलीपाडा येथील माता-भगिनींचा हरिपाठ पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पाटलीपाडा येथील भारूड भजन. विशेष म्हणजे ५० वर्षांपूर्वी मदनबुवा पाटील (पाटील पाडा) यांनी येथे भारूड सादर केले होते. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र रंगनाथ मुंडे, माधव मामा, दामू मामा, पदु दादा आणि त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सुमारे ७० तरुणांनी मिळून सादर केलेल्या भारुडाने उपस्थितांची मने जिंकली.

पालखी सोहळ्याने सांगता

उत्सवाच्या सांगतेवेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि दिमाखात हनुमंतरायाची पालखी काढण्यात आली. “बजरंग बली की जय” च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. ५० व्या वर्षाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली. हनुमंतरायाचा आशीर्वाद सदैव गावकऱ्यांवर आणि या परिसरावर राहो, अशी प्रार्थना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी हनुमंत राया चरणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |