ठाणे - ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणी असलेली वेधशाळा शहापूर येथे निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांनी बांधली आहे. सॅपो नावाच्या या खगोलकेंद्राचे उद्घाटन खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते रविवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी संपन्न झाले.
यावेळी डाॅ.विजय महाजन आणि इतर खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार श्री.दौलतरावजी म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि वेधशाळा शहापूरला माझ्या मतदारसंघात होत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. त्याबद्दल मी निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. खगोलप्रमींनी शहापूरच्या या प्रकल्पाला मोठ्या संख्येने भेट द्यावी. या प्रकल्पाला काही मदत लागली तर ती मी अवश्य करीन.
खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण म्हणाले की, आकाश हे उघडे पुस्तक आहे. इतर पुस्तके अभ्यासायला ती उघडावी लागतात, आकाशाचे पुस्तक तर सदैव उघडलेले असते. इतर पुस्तके विकत घ्यावी लागतात, आकाश तर मोफत अभ्यासायला मिळते. इतर पुस्तके वाचायला प्रकाश लागतो, आकाश तर काळोखातच वाचायचे असते. ठाकूर बंधूनी शहापूर येथे ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणी असलेली वेधशाळा बांधली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुढील पाच वर्षात आकाशात काय घडेल याची माहिती देणारे माझे ' पाच वर्षांचे आकाश ' हे पुस्तक भेट देतो.शहापूरचे हे खगोल केंद्र खगोल शिक्षणाचे केंद्र व्हायला हवे. ज्या प्रौढांना खगोलशास्त्र छंद म्हणून जोपासायचा आहे, त्यांना इथे शिक्षणाची सोय करायला हवी. हे केंद्र पाहिल्यावर मुलांना खगोलशास्त्र शिकण्याची आवड निर्माण व्हायला हवी. या मुलांतून शास्त्रज्ञ निर्माण व्हायला हवेत. लोकांमधील ग्रहणे, धूमकेतू , उल्कावर्षाव, ग्रह-तारका यासंबंधीच्या गैरसमजुती- अंधश्रद्धा जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे. खगोलशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करून त्या संबधीची छोटी छोटी पुस्तके तयार करूया. शहापूर हे खगोल शिक्षणाचे केंद्र बनवूया. प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी या वेधशाळेचा छान उपयोग होईल. मी आमदार साहेबाना विनंती करतो की, तारांगणापर्यंतचा रस्ता रूंद व चांगला करून जवळच्या रेल्वे स्टेशनपाससून बस सर्विस सूरू करावी. म्हणजे खगोलप्रेमींची चांगली सोय होईल. ठाकूरबंधूना एक विनंती करतो की महिन्यातील एक दिवस त्यांनी आश्रमशाळेतील गरीब विद्यार्थ्यांना तारांगणाचा एक शो मोफत दाखवावा.
उद्घटनानंतर सर्व खगोलप्रेमींना तारांगणात एक शो दाखविण्यात आला. वेधशाळेचे छप्पर अलगद बाजूला झाले आणि अत्याधुनिक दुर्बिणी आकाशातील तेजोगोलांचा वेध घेऊ लागल्या. प्रथम दा.कृ.सोमण यांनी लेझर पाॅइंटरच्या सहाय्याने ध्रुव तारा, सप्तर्षी आणि ग्रहनक्षत्र तारकांचे दर्शन घडविले. नंतर दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे आणि त्याच्या चार चंद्रांचे दर्शन घडविण्यात आले. सर्व खगोलप्रेमीनी ठाकूर बंधूंचे अभिनंदन करून आभार मानले. शहापूरच्या माळरानावर ठाकूर बंधूनी ग्रह-नक्षत्र तारकांची बाग फुलविली आहे.
