Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांची पूर्तता: भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोदींजींच्या कार्यकाळाला ‘राष्ट्रनिर्माणाचा सुवर्णकाळ’म्हणून केले अधोरेखित

डोंबिवली ( शंकर जाधव ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा बदलला चेहरा; 12 वर्षांच्या त्यांच्या कार्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एवढेच नाही तर देशात मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्ड च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिले आहे. ज्या भारताकडे पूर्वी एक याचक राष्ट्र म्हणून पाहिले जायचे, त्याला जागतिक महाशक्ती बनविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले. देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी २६ मे २०२६ रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण करत आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले आहे. या ऐतिहासिक पर्वानिमित्त 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज मुंबईतील प्रभादेवी स्थित रविंद्र नाट्यमंदिर येथे करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या सोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींजींनी मागील 12 वर्षांत केलेले कार्य खूप मोठे आहे. एका पुस्तकात ते कार्य मांडणे खूप कठीण काम आहे. देशातील तळागाळातील शेवटच्या माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोदींजींनी सतत प्रयत्न केले. हर घर शौचालय, उज्वला गॅस योजना यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या. सरकारच्या अनुदानावर जनतेला न ठेवता गरीब केंद्रित अजेंडा त्यांनी राबवला. त्याचाच परिणाम म्हणून मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश आले. भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढवला. महाराष्ट्राचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढवला. हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. पंतप्रधान मोदींजींचे 12 वर्षांत केलेला देशाचा विकास हा फक्त घोषणांनी झालेला नाही, तर त्यामागे त्यांची विकासाभिमुख नियोजनबद्ध रणनीती हे मुख्य कारण आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगासमोर एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केला आहे. आजचा भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा, डिजिटल तंत्रज्ञानाने सक्षम झालेला, उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात काढले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”म्हणजे खरंतर देशाच्या जनतेने अनुभवलेला परिवर्तनाचा इतिहास आहे, असे सांगत रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, गेल्या एका तपामध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेला बदल प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे. शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था मोदी सरकारने निर्माण केली.

पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला. देशातील गरीबांच्या घरात उजेड, महिलांच्या आयुष्यात सन्मान, युवकांच्या हातात संधी आणि सामान्य नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. “एक भारत, अखंड भारत”ते “विकसित भारत”या प्रवासातील परिवर्तनाची १२ विषयांवरील तथ्यपूर्ण मांडणी या विशेष अंकातून करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या विशेष संग्राह्य अंकामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा भारत, मातृप्रधान भारत अशा विषयांपासून विज्ञान, उद्योग आणि विकसित भारत २०४७ यावर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेला प्रभाव, सीमांवर शत्रूला दिलेले सडेतोड उत्तर आणि जगातील संकटसमयी मानवतेसाठी धावून जाणारा संवेदनशील भारत यांचेही या अंकात दस्तावेजीकरण करण्यात आले आहे. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”हा केवळ स्मरणिका नसून नव्या भारताच्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरणारा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी नमूद केले.

“काही व्यक्ती अध्यात्मातून तपस्या करतात, काही कला आणि साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी जगतात; पण मोदीजींनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे. म्हणूनच ते राष्ट्र तपस्वी आहेत,” असे सांगत मोदीजींच्या कार्याची पुस्तकरूपी माहिती जनतेला संकलित स्वरूपात द्यावी, या उद्देशाने “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती”हा विशेष संग्राह्य अंक प्रकाशित करण्यात आल्याचेही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |