Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराला जमीन : ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

- मंदिर परिसराच्या विकासाला मिळणार गती


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिराच्या व्यापक विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार, दिनांक २६ मे २०२६ झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिर ट्रस्टला तब्बल ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा आणि सद्यस्थितीतील जमिनीचा वापर नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पिंपळेश्वर मंदिर समितीने आभार मानले आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील प्राचीन आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कल्याण-शिळ मार्गालगत हिरव्यागार वातावरणात वसलेले हे मंदिर भाविकांसाठी शांतता आणि अध्यात्माचा अनुभव देणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसर सुमारे चार एकरांमध्ये पसरलेला असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराभोवती विकसित करण्यात आलेला बगीचा, नैसर्गिक वातावरण आणि धार्मिक शांतता यामुळे हे ठिकाण भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे “नवसाला पावणारे देवस्थान” अशी या मंदिराची ओळख असून परिसरातील नागरिकांमध्ये या मंदिराबद्दल विशेष श्रद्धा आहे. मात्र गेली अनेक वर्ष या मंदिराच्या जागेचा प्रश्न रखडलेला होता. मंदिर परिसराने व्यापलेली जागा ही अधिकृत होणे आणि ही जागा मंदिराला मिळणे महत्वाचे होते. एमआयडीसीच्या ताब्यात असलेली ही जमीन मंदिर समितीला मिळावी यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सातत्याने महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाकडे पाठपुरावा केला होता.


याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या जमिनीवर मंदिर ट्रस्टकडून होत असलेला सध्याचा वापर अधिकृतपणे नियमित करण्यालाही सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. पिंपळेश्वर मंदिराच्या या प्रलंबित जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मागील अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पिंपळेश्वर मंदिर समितीने आभार मानले आहेत. तर या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आणि महायुती सरकारचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत.


डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराचा इतिहास

डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरातील हिरव्यागार आणि शांत परिसरात श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. साधारण १५० वर्षांपूर्वी स्वामी शिवानंद यांनी या पवित्र ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती, अशी या मंदिराची महती आहे. सुरुवातीच्या काळात पिंपळाच्या झाडाखाली एका छोट्याशा जागेत हे मंदिर होते. सुमारे सत्तरच्या दशकात एमआयडीसीने उद्योग उभारणीसाठी मंदिर परिसराच्या आसपासच्या विविध जागा संपादित केल्या.. मंदिर परिसराचा देखील यात समावेश होता. एमआयडिसीने जागा संपादित केली असली तरी ही जागा ताब्यात घेऊन त्यावर कुठलीही उभारणी केली नव्हती. मात्र मंदिराच्या विकासासाठी ही जागा समितीच्या नावे होणे गरजेचे होते. महाराष्ट्र शासनाने १९९७ साली पिंपळेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता.
त्यानंतर ३१ जानेवारी २००१ रोजी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पुढाकार घेऊन या मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि भव्य मंदिराची पुनर्रचना केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. सध्या या ठिकाणी राम मंदिर, मारुती मंदिर, गोशाळा, वेदशाळा, भक्तनिवास, सामाजिक सभागृह, २ मोठी मैदाने तसेच सुमारे ४०० हुन अधिक जुनी वृक्ष आहेत. या निर्णयामुळे या सर्वांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |