खाजगी बस मार्फत होणारी अवैध, धोकादायक मालवाहतूकीवर प्रतिबंध आणण्याची मनसे वाहतूक सेनेची मागणी
नवी मुंबईतील वाशीमध्ये नुकत्याच एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. या संदर्भात मनसे शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनसे वाहतूक सेनेतर्फे अनेक वेळा खाजगी प्रवासी बसमार्फत सुरू असलेल्या अवैध मालवाहतुकीबाबत परिवहन कार्यालयास लेखी निवेदने व तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी केवळ दिखाऊ व थातूरमातूर कारवाई करून विषय दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अधिकाऱ्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आणून दिली. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या बसमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरला जात असून प्रवाशांच्या जीवाशी सरळ खेळ केला जात आहे. बसच्या डिक्या, छत तसेच आसनांमध्ये माल कोंबून वाहतूक केली जाते. अनेक वेळा धोकादायक व ज्वलनशील वस्तूंचीदेखील वाहतूक केली जाते. तरीही संबंधितांवर कायमस्वरूपी व कठोर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला.
सदर निवेदनाद्वारे मनसेने परिवहन कार्यालयास खालीलप्रमाणे कारवाई संदर्भात मागणी केली आहे.
१) वाशीमध्ये आग लागलेल्या मनिष ट्रॅव्हल्सच्या बस मध्ये अवैध माल वाहतूक करण्यात आली त्याची सखोल चौकशी करून त्याचा चौकशी अहवाल तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा.
२) अवैध मालवाहतूक करणाऱ्या सर्व खाजगी प्रवासी बसवर विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवावी.
३) संबंधित वाहन मालक, चालक व दलाल यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
४) वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनांचे परवाने तात्काळ निलंबित अथवा कायमस्वरूपी रद्द करावेत.
५) कारवाईची माहिती सार्वजनिक करावी व जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करावी.
६) भविष्यात अशा प्रकारांना कायम आळा बसेल अशी कठोर व कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी.
येत्या १५ दिवसात कठोर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन खानविलकर यांनी दिला. मनसेच्या या शिष्टमंडळात मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखिल गावडे, अक्षय भोसले, मनसे विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना चिटणीस प्रशांत विजय कुबल, संदीप दहिफळे, दत्ता काळे, दत्ता रोमन, राम कदम व मोठ्या प्रमाणात वाहतूक सेना सभासद, मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

