ठाणे दि.19 :- शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी आज ड्रोनचा वापर केला जातो. हे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात; मात्र राज्य शासनाच्या एका योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण चक्क मोफत दिले जाते. एवढेच नव्हे, तर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जातो. ही योजना अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवली जात आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, तो १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. अमृत संस्थेच्या या दर्जेदार कोर्सची कीर्ती ऐकून गोवा सरकारने आपल्या तीस अधिकाऱ्यांना अमृत संस्थेकडून ड्रोनचे प्रशिक्षण दिले. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.
ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली.
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.मुख्यत्वेकरून शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात 'डीजीसीए'ची सुरक्षित उड्डाण नियमावली, तसेच आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. कोर्स कालावधीतील १० दिवसांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आणि खर्चही अमृत संस्थाच करते. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला ड्रोन विकत घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येऊ शकेल.
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
कार्यालय कुठे? अर्ज कसा करायचा?
पुण्यात औंधमध्ये अमृत संस्थेचे मुख्यालय आहे. तसेच, अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो.
ठाणे जिल्ह्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क : माया रत्नपारखी - खेत्रे : 9112226533
नियम :
- उमेदवार वर दिलेल्या लक्ष्यित गटातील असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे.
- उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- अन्य सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला घेणे आवश्यक.
या योजनेविषयीची सविस्तर माहिती https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245 या लिंकवर उपलब्ध असून, या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो, असे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा उपव्यवस्थापक, ठाणे माया रत्नपारखी-खेत्रे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

