शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांची मागणी
दिवा:- दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिवा परिसरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती वारंवार लेखी स्वरूपात देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे. सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे तसेच प्रभाग क्रमांक २७ चे बीट अधिकारी संतोष लहाने, प्रभाग क्रमांक २८ चे बीट अधिकारी सुहास रोकडे आणि प्रभाग क्रमांक २९ चे बीट अधिकारी रुपेश पाटील यांनी आपल्या कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दिवा विभागातील सर्व अनधिकृत बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण करून संबंधित बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ॲड. रोहिदास मुंडे म्हणाले, "दिवा शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अनधिकृत बांधकामांना आळा बसणार नाही."
या प्रकरणात ठाणे महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे दिवाकरांचे लक्ष लागले आहे.

