Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पंडित अरुण कशाळकर यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर

डोंबिवली ( शंकर जाधव ) : वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही संगीताचार्य पंडित अरुण कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतविश्वातील एक मानबिंदू म्हणून कार्यरत आहेत. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन महान घराण्यांच्या परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेले पंडित कशाळकर हे आकाशवाणीचे सर्वोच्च श्रेणीचे (Top Grade) कलाकार असून, ख्यालगायक , संगीतकार, रचनाकार, अभ्यासक आणि गुरु या सर्व भूमिकांमध्ये त्यांनी विलक्षण कार्य केले आहे.

संगीताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून, ऍडव्होकेट ना. द. कशाळकर यांच्याकडून लाभला. त्यानंतर पं. राजाभाऊ कोगजे, पं. डी. व्ही. पनके, पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी आणि पं. बबनराव हळदणकर यांसारख्या दिग्गज गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे सखोल शिक्षण घेतले. विविध घराण्यांतील वैशिष्ट्यांचा केलेला अभ्यास त्यांच्या गायकीत आजही प्रकर्षाने जाणवतो. पंडित अरुण कशाळकर यांनी देश विदेशातील अनेक प्रतिष्ठित स्वरमांचावर आपल्या प्रभावी गायनाने श्रोत्यांची मने जिंकली आहेत.

पंडित कशाळकर यांच्या गायकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रागस्वरूपाची अत्यंत सूक्ष्म जाण, लयकारीवरील असामान्य प्रभुत्व आणि रागविस्तारातील विचारसंपन्नता. विशेषतः आग्रा घराण्याच्या परंपरेतील नोम-तोम आलापी त्यांनी अत्यंत प्रवाही, प्रभावी आणि रसपूर्ण स्वरूपात जतन केली आहे. सरगमच्या माध्यमातून राग आणि लय यांचे अद्वितीय दर्शन घडविण्याची त्यांची शैली हिंदुस्थानी संगीतविश्वात विशेष मानली जाते.

रचनाकार म्हणूनही त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘रसदास’ या नाममुद्रेने त्यांनी विविध रागांमध्ये दोनशेहून अधिक बंदिशींची निर्मिती केली आहे. या बंदिशींमध्ये आग्रा घराण्याच्या सौंदर्यदृष्टीचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसतो. शब्द आणि स्वर यांचा सुरेख संगम, रागधर्माची जपणूक आणि सादरीकरणातील प्रभावीपणा यांमुळे त्यांच्या रचना आज अनेक कलाकार आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यासल्या व सादर केल्या जातात.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते गुरु म्हणून कार्यरत आहेत. पारंपरिक गुरू-शिष्य परंपरेचे जतन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडविले आहे. त्यांच्या अध्यापनात केवळ बंदिशी किंवा राग शिकविले जात नाहीत, तर संगीताचा विचार, सौंदर्यदृष्टी, स्वरसंस्कार, लयज्ञान आणि कलात्मक प्रामाणिकता यांचेही संस्कार घडविले जातात. त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक नामवंत कलाकार, संशोधक आणि शिक्षक घडले आहेत.

पंडित अरुण कशाळकर हे सोळा वर्ष डोंबिवलीला वास्तव्यास होते.पंडित कशाळकर हे डोंबिवलीतील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेचे गेल्या १२ वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत असून, ही संगीतसेवा ही करत आहेत. संगीताचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

आजच्या वेगवान आणि बदलत्या काळात परंपरा आणि नवसर्जन यांचा सुंदर समतोल साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पंडित अरुण कशाळकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संगीतसाधना, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. कलाकार, गुरु, रचनाकार आणि अभ्यासक या सर्व भूमिकांमधून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला समृद्ध केले आहे.

पंडित अरुण कशाळकर यांचे कार्य हे केवळ एका व्यक्तीचे यश नसून भारतीय संगीतपरंपरेच्या सातत्याचे आणि वैभवाचे प्रतीक आहे.

पंडित अरुण कशाळकर यांच्या या बहुआयामी आणि दीर्घकालीन योगदानाची दखल घेत भारत सरकारच्या सर्वोच्च सांस्कृतिक संस्थांपैकी एक असलेल्या संगीत नाटक अकादमी ने त्यांना यावर्षी प्रतिष्ठित असा 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्रदान करून गौरविले आहे. भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. कलाकार, रचनाकार, गायक,अभ्यासक आणि गुरु या सर्व स्तरांवर त्यांनी केलेल्या असामान्य कार्याची ही राष्ट्रीय पातळीवरील योग्य दखल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |