जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे ढोल लेझीमच्या गजरात स्वागत; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
ठाणे, दि. १५ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त जिल्हा परिषद शाळा दिवे-अंजूर येथे शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे. शाळांच्या विकासासाठी आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.”
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आपल्या मनोगतात निपुण महाराष्ट्र अभियान, मूलभूत वाचन-लेखन व संख्याज्ञान विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविल्यास त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम पाया तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी युवराज कदम, दिवे-अंजूर गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आंब्रे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या आकर्षक सादरीकरणातून मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आनंद, आत्मीयता आणि उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या शाळापूर्व तयारी मेळावा-२ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वजन व उंची मोजणी, सेल्फी पॉईंट, निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मूलभूत वाचन व संख्याज्ञान विषयक उपक्रम तसेच विविध शैक्षणिक स्टॉल्सचे आकर्षक नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळेची ३४६ विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. शैक्षणिक स्टॉल्स व आनंद मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबरोबरच पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

