Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा ; 1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे रोखठोक मत

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) पनवेल तालुक्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशी सरकारने केलेली प्रतारणा आहे, असे रोखठोक मत १९८४ च्या उरणच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातील अग्रभागी असलेल्या रणरागिणी भारतीताई पोवार यांनी जसखार येथे मंगळवारी (ता. २३) आपले मत व्यक्त केले.

 यावेळी भारतीताई म्हणाल्या, "१९८४ च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व दि. बा. पाटील साहेब करीत होते. ते आंदोलन शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला म्हणून होते. दि. बा. पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यावेळी दिबांचा मला आदेश आला, तुम्ही तातडीने निघून या. त्यावेळी मी २३ वर्षांची होती. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी तान्ह्या बाळाला घरी सोडून कोल्हापूर येथून तडक निघून आले जासईला. त्यावेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी उरणला येण्यासाठी माझ्याकडे तिकिटासाठी जवळ पैसे नव्हते. एकाकडून शंभर रुपये उसणे घेऊन आले. पाहतो तर परिसरातील गावे ओस पडली होती. प्रचंड पोलिसांचा फौजफाटा होता. एसआरपी बंदुका जणू रोखूनच होते, अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे दिबांनी जणू काही माझ्यावर विश्वास ठेवून आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे सोपवून पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जणू आदेश दिला होता. तो कार्यकर्ती म्हणून मी स्वीकारला आणि आंदोलनाच्या तयारीसाठी गावोगावी जाऊन गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांमधून निर्धार करण्यात आला. सरकारसमोर झुकायचे नाही. एक इंच जमिनीवर सुद्धा ताबा द्यायचा नाही. त्यामुळे १९८४ च्या त्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात गावोगावच्या शेतकऱ्यांनी घरादाराला कुलपे लावून एकप्रकारे घरावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर उतरले होते. ते दिवस अंगावर काटा आणणारे आहेत." असेही भारतीताई म्हणाल्या.

दिबांची (ता. २५) पुण्यतिथी आहे. त्यामुळे भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरवरून आल्या आहेत. त्यांचे आगमन होताच स्वतः आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे सारथ्य केले. सर्वप्रथम भारतीताई यांनी गव्हाण येथील शांतादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर उरण तालुक्यातील जसखार येथील रत्नेश्वरीचे दर्शन घेतले. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचे वाटप त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीताई म्हणाल्या, "आंदोलनाला जवळ जवळ ४२ झालीत, पण माझा सन्मान फक्त महेंद्रशेठ घरत यांनी आईच्या नावाने पुरस्कार देऊन केला. सध्या सर्वांचे भले व्हावे म्हणून विचार करणारा महेंद्रशेठ मला दिसतोय. त्याचे काम मी डोळ्यांदेखत पाहातोय. तो ग्रेट माणूस आहे."

त्यानंतर त्या आंदोलनात सक्रिय असणारे पी. जे. पाटील यांची भारतीताई आणि महेंद्रशेठ घरत यांनी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. पी. जे. पाटील परिवाराने यावेळी भारतीताई यांचा साडीचोळी देऊन यथोचित सन्मान केला.

दरम्यान, उरण परिसर पाहून भारतीताई गहिवरल्या. जुन्या आठवणींत रमल्या. महेंद्रशेठ घरत स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा, गावांचा, परिसराचा, डोंगररांगांचा आवर्जून उल्लेख केला. हा संपूर्ण परिसर मी पायी फिरले. अनेक जण सोबत होते. तहानभूक विसरून आंदोलन केले. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. हे सर्व महेंद्रशेठ घरत ऐकून घेऊन म्हणाले, "मी त्यावेळी १२ वीला होतो. विद्यार्थिदशेत असतानाही आंदोलन सहभागी झालो होतो. माझ्या शेजारी असणाऱ्या गव्हाण कोपर येथील एका सहकारीला गोळी लागली. सगळे सैरावैरा पळत होते, पोलिसांच्या गोळीबारामुळे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |