Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीस जोरदार सुरुवात


भाजप गटनेते शशिकांत कांबळे आणि महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांची त्रिमूर्ती नगर, डोंबिवली पूर्व येथे विशेष जनजागृती मोहीम

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजप गटनेते व नगरसेवक शशिकांत कांबळे तसेच महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी गुरुवारी 'फ' प्रभागातील त्रिमूर्ती नगर, डोंबिवली पूर्व येथे एक विशेष जनजागृती मोहीम आयोजित केली. या मोहिमेमध्ये नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा संकलन, तसेच रस्त्यांवर कचरा टाकण्याच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण हे केवळ नियमाचे पालन नाही, तर ते शहराच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेले एक महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे. प्रत्येक घरातून कचरा, स्रोतावरच ओला व सुका असा वेगळा करून द्यावा, तरच शहर स्वच्छ व सुंदर राहील, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

या मोहिमेदरम्यान नागरिकांना कचरा संकलन वाहन येण्यापूर्वी घरातील कचरा रस्त्यावर न टाकता, केवळ वाहन आल्यावरच थेट त्यात द्यावा, असेही आवाहन करण्यात आले. रस्त्यांवर कचरा टाकल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो, तसेच शहराची प्रतिमा मलिन होते, असे नागरिकांना समजावून सांगण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग हाच खरा आधार आहे. महापालिका यंत्रणा सक्षम आहे, परंतु नागरिकांनी जर घरातून योग्य पद्धतीने वर्गीकृत कचरा दिला नाही, तर संपूर्ण साखळी विस्कळीत होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा आणि उल्लेखनीय पैलू म्हणजे भाजप गटनेते व नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी घेतलेला पुढाकार. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत लीड फॅसिलिटेटरची भूमिका भाजपा गटानेते शशिकांत कांबळे स्वतः बजावणार असून महापालिकेतील सर्व नगरसेवकांनीही आपापल्या वॉर्डात अशाच प्रकारच्या जनजागृती मोहिमा राबवाव्यात आणि लीड फॅसिलिटेटर म्हणून पुढाकार घ्यावा, असे प्रखर आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापालिका क्षेत्राला अधिक स्वच्छ, अधिक हरित व अधिक निरोगी बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचे आहे,"शहराची स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक लोकप्रतिनिधीची आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान ठेवूनच आपण भविष्यातील पिढ्यांसाठी एक सुंदर, स्वच्छ व हरित शहर उभे करू शकतो असेही ते पुढे म्हणाले.

त्रिमूर्ती नगर येथील रहिवाशांनी या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. नागरिकांनी कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजून घेत योग्य पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प केला. आमच्या प्रभागात असे उपक्रम नियमितपणे व्हावेत आणि नगरसेवक स्वतः येऊन समजावून सांगतात हे अतिशय प्रेरणादायी आहे असे उद्गार रहिवाशांनी यावेळी काढले

केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात नव्या युगाचा प्रारंभ होत असल्याचे चित्र दिसत आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या संपूर्ण व प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका, लोकप्रतिनिधी( लीड फॅसिलिटेटर) आणि नागरिक यांच्यातील हा त्रिस्तरीय समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

येत्या काही दिवसांत महापालिकेच्या अन्य प्रभागांमध्येही अशाच प्रकारच्या जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. नगरसेवकांनीही आपापल्या वॉर्डात लीड फॅसिलिटेटर्सच्या साहाय्याने जनजागृती करण्याची तयारी दर्शवली आहे.

आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. कचरा रस्त्यावर टाकू नका, कचरा वाहनातच द्या, ओला व सुका कचरा वेगळा करा आणि आपल्या शेजाऱ्यांनाही याबाबत जागृत करा. एक स्वच्छ, हरित व निरोगी कल्याण-डोंबिवली घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे आवाहन महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |