Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यांत पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल -पालकमंत्री उदय सामंत

भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकासकंपनीमध्ये सामंजस्य करार

रत्नागिरी, दि. ५- रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे रत्नागिरी विमानतळाचा ७५ टक्के टप्पा पूर्ण झाला असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली. तसेच, पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित या विशेष करार प्रसंगी जि. प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, माजी आमदार विनय नातू, उद्योजक दीपक गद्रे, रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पटवर्धन, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, विमानतळाच्या भूसंपादनासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून १० ते १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे हे राज्यातील सर्वात सुंदर विमानतळ बनवण्याचा प्रयत्न आहे.

पंचतारांकित हॉटेल्स आणि ॲडव्हेंचर पार्क : रत्नागिरीत ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’ सारखी पंचतारांकित हॉटेल्स यावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, वन विभागाच्या जागेवर ‘ॲडव्हेंचर पार्क’ उभारले जाईल, ज्याचे मुख्य आकर्षण ‘झाडावरील रेस्टॉरंट’ (Tree House Restaurant) हे असेल.

महिला बचत गटांना सुवर्णसंधी : स्थानिक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी रत्नागिरी विमानतळावर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन (स्टॉल) उपलब्ध करून दिले जाईल.

आर्थिक विकासाला गती : विमानतळ सुरू झाल्यामुळे रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि काजू थेट परदेशात निर्यात करणे अधिक सोपे होईल, ज्यामुळे स्थानिक उद्योग आणि व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

“मी रायगडचा पालकमंत्री असताना नवी मुंबई विमानतळ आणि सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना चिपी विमानतळ सुरू झाले. आता रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून येथील विमानतळ सुरू होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” – पालकमंत्री उदय सामंत

“विमानतळामुळे पर्यटनासोबतच स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला मोठी मदत होईल. जागतिक आकडेवारीनुसार, विमानतळ १० वर्षे यशस्वी चालल्यास त्या भागाच्या जीडीपीमध्ये (GDP) थेट ८ टक्के वाढ होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आमचा भर आहे.”- दीपक कपूर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, MADC

“लष्करी आणि नागरी विमान वाहतुकीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. परिसरात स्वच्छता राखून पक्षांमुळे होणारा विमानांचा धोका शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.” – कुणाल नाईक, कमांडिंग ऑफिसर, आयसीजीएएस

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले, तर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नगरसेवक, व्यावसायिक, उद्योजक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |