Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ शिक्षणप्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवासी वाहतुकीचे साधन नसून राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ अनेक दशकांपासून प्रभावीपणे पार पाडत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले असून त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

राज्यात दररोज सुमारे ३० हजार १७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे.

अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शंभर टक्के मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेट देण्यासाठीच्या प्रवासासाठीही ५० टक्के सवलत देण्यात येते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २५.१३ लाख अहिल्यादेवी होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे. कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत दिली जात आहे. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३ हजार ६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

एसटीची ‘लालपरी’ ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानवाहिनी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्यासाठी एसटी महामंडळ अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करत राहील, असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |