Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

भूमिपुत्रांच्या अस्मितेचा आवाज... लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी खंबीर साथ – आमदार राजेश मोरे


डोंबिवली ( शंकर जाधव ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या भूमिपुत्रांच्या न्याय्य व हक्काच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

उपोषणाच्या आठव्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्या सौ. रश्मिता पोपटा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. अनेक दिवसांच्या आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असली, तरी भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांचा निर्धार, संघर्ष आणि समर्पण आजही कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले की, "लोकनेते स्व. दि. बा. पाटील हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून, ते भूमिपुत्रांच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. नवी मुंबईच्या उभारणीत स्थानिक शेतकरी, कष्टकरी आणि भूमिपुत्रांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा आणि अस्मितेचा सन्मान करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे."

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री.एकनाथजी शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार मॅडम तसेच खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी तातडीने चर्चा करून भूमिपुत्रांच्या भावना आणि न्याय्य मागणी केंद्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडली जाईल. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, यासाठी सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यानंतर चिंचपाडा पुलाखाली सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनात सहभागी भूमिपुत्रांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेत या ऐतिहासिक जनआंदोलनाला आमदार श्री.राजेश मोरे व शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री.गोपाल लांडगे यांनी संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

"भूमिपुत्रांचा सन्मान म्हणजे आपल्या मातीतल्या अस्मितेचा सन्मान आहे. हा लढा केवळ नामकरणाचा नसून योगदान,इतिहास, त्याग आणि स्वाभिमानाचा सन्मान करण्याचा आहे. लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सुरू असलेल्या या जनभावनेसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सकारात्मक निर्णय होईपर्यंत भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आमचा आवाज बुलंद राहील," असेही आमदार राजेश मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील, पनवेल महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश सोमण, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. मंदा जंगले, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, शहर संघटिका अर्चना जाधव तसेच शिवसेना कल्याण ग्रामीण व संघर्ष समितीचे पदाधिकारी दत्ता वझे, गजानन मांगरुळकर, बाळाराम ठाकूर, भास्कर पाटील, जितेंद्र ठाकूर, दत्ता म्हात्रे, अमित वझे, रमेश पाटील, नवनाथ पाटील, मधुकर पाटील, सोनू संते आणि सागर म्हात्रे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |