Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे जिल्हा परिषदेतर्फे ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा ; प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सन्मान

ठाणे, दि. ०१  : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘कृषी दिना’निमित्त जिल्हा परिषद ठाणे कृषी विभाग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका, ठाणे येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच पद्मश्री सिंधुताई सकपाळ स्वाभिमान योजना अंतर्गत लाभार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात २५ प्रगतशील शेतकरी, पद्मश्री सिंधुताई सकपाळ स्वाभिमान योजना अंतर्गत लाभार्थी, शेतकरी-शेतमजूर बचत गट, ग्रामपंचायत स्तरावरील १३ महिला बचत गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव म्हणाले,
"शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजजीवनाचा खरा कणा आहे. आज सन्मानित होत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड शेतीशी घालणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक पिकांसोबत फळबाग, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आधुनिक, शाश्वत आणि बाजाराभिमुख शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध आहे."
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले,

"कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचे नियोजन आणि मूल्यवर्धन यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. आज सन्मानित करण्यात आलेले प्रगतशील शेतकरी आणि महिला बचत गट हे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. शासनाच्या विविध कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण उद्योजकता योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे शक्य आहे. महिला बचत गटांनी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषद ठाणे शेतकरी, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. आत्मनिर्भर आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था उभारण्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे गरजेचे आहे."

कार्यक्रमादरम्यान भिवंडी तालुक्यातील लाभार्थी महिला शेतकरी ज्योत्स्ना प्रकाश राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही मी शेतीच्या माध्यमातून घराला आधार देण्याचा निर्धार केला. शासनाच्या योजनेअंतर्गत मला सुरुवातीला एक म्हैस मिळाली. त्यानंतर सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या बळावर आज माझ्याकडे २५ म्हशी आहेत. दुग्धव्यवसायासोबतच शेतीमध्ये विविध पिकांचे उत्पादन घेऊन मी कुटुंबाचे उत्पन्न वाढवू शकले. आज जिल्हा परिषद ठाणेकडून झालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. हा गौरव इतर महिलांनाही आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देईल."

कार्यक्रमामध्ये कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतमालाचे विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचे नियोजन आणि मूल्यवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. अनिल निवळकर यांनी एसआरटी (SRT) पद्धतीने भात लागवड या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे मार्ग सांगितले. श्री. समीर खिलारे आणि श्री. लक्ष्मण पाटील यांनी निर्यातक्षम भेंडी लागवड या विषयावर मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी, दर्जात्मक निकष आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती दिली. श्री. किरण पाटील यांनी फुलशेती लागवड व विक्री व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फुलशेतीमधील रोजगार व उत्पन्नवाढीच्या संधी स्पष्ट केल्या. तसेच डॉ. अजित हिरवे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील विविध योजनांची माहिती देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

याशिवाय कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, हवामान बदल, अल निनो आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवरही तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विविध विभागांच्या माहितीपर प्रदर्शन स्टॉल्सद्वारे शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी यांत्रिकीकरण, अनुदाने, मूल्यवर्धन, निर्यात क्षमता आणि आधुनिक शेती पद्धतींबाबत उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात आली.

जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, कृषी दिन हा केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांना नव्या संधी, तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांशी जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. शाश्वत व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्याची आवश्यकता असून जिल्हा प्रशासन त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी क्षेत्रातील विविध घटकांना नवी प्रेरणा मिळाली असून आधुनिक आणि आत्मनिर्भर शेतीच्या दिशेने वाटचाल अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |