७३ वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई
डोंबिवली (शंकर जाधव) : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि डोंबिवली वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (१७ जुलै) डोंबिवलीतील विविध ठिकाणी संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. या मोहिमेत एकूण ८५ रिक्षा व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७३ वाहनांवर मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत ई-चलन मशीनद्वारे कारवाई करून एकूण ६१,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, रामनगर रिक्षा स्टँड तसेच डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केट आणि महात्मा फुले चौक परिसरात करण्यात आली. तपासणीदरम्यान रिक्षा व इतर वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा (इन्शुरन्स), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC), परवाना (परमिट), चालकाचा गणवेश व बॅज आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या संयुक्त कारवाईत डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक कैलास घोलप व वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच कल्याण आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक आमते, मोटार वाहन निरीक्षक मांजरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भुसे आणि चालक आव्हाड यांनी सहभाग घेतला.

