मुंबई ( शांताराम गुडेकर ) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A1, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉन आणि हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाष नगर, चेंबूर येथे 'प्रोजेक्ट सक्षम – डिजिटल शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करणे' या उपक्रमांतर्गत डिजिटल (स्मार्ट बोर्ड) क्लासरूम व संगणक संचाच्या उद्घाटनाचा सोहळा शुक्रवारी (दि. १७ जुलै २०२६) उत्साहात पार पडला.
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात शिक्षण हे केवळ पुस्तके आणि फळ्यापुरते मर्यादित राहिलेले नसून आधुनिक, संवादात्मक व डिजिटल शिक्षणाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'प्रोजेक्ट सक्षम' हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231-A1 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पवन के. अग्रवाल उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त पीयूष जेसराणी, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनचे एक्स्टेंशन चेअरमन लायन विजय रायमने व लायन मोहन वायदंडे, क्लबचे अध्यक्ष लायन जितेंद्र दगडूदादा सकपाळ, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर लायन वीणा दोरवणकर, शाळेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष एकनाथ आव्हाडकर, लायन भाग्यश्री वर्तक, लायन नितीन पन्हाळकर, लायन सचिन राऊत, लायन नीरजा सकपाळ, सुषमा सकपाळ, राजेश जैन तसेच शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ज्ञानार्जन करावे, असे आवाहन केले. शाळेत उभारण्यात आलेली डिजिटल क्लासरूम व संगणक संच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

