मुंबई ( शांताराम गुडेकर ) : लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील महिला व पुरुष कलावंतांचा भव्य सत्कार सोहळा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात लोककलेच्या जतन-संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज भोसले, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, पद्मश्री रघुवीर खेडकर, महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे, उद्योजक शिवाजी तोरणे, चारुशीला गोलम, पार्श्वगायिका शकुंतला जाधव, शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सचिव एच. बी. जंगम, पत्रकार भीमराव धुळप, निर्माते इंजि. मोहन पवार यांच्यासह कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोककला व लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना "लावणी गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला. चित्रपट अभिनेते चंद्रकांत बारशिंगे यांना पद्मश्री रघुवीर खेडकर आणि मेघराज भोसले यांच्या हस्ते लावणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लावणी कलावंत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव सोहळा होय. शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमातून कला आणि शिक्षण यांचा सुंदर समन्वय साधण्याचा महासंघाचा सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
यापूर्वी ३ जून रोजी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त जयेश चाळके, अध्यक्षा कविता घडशी, सरचिटणीस विशाल सदाफुले, खजिनदार योगिता मोर्जे आणि समन्वयक विजय कर्जावकर यांनी यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली होती.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये नामवंत संगीतकार मधुकर रेडकर, शाहीर आनंद सावंत, लावण्यवती कविता घडशी, लोककलावंत चंद्रकांत बारशिंगे, गायिका श्रद्धा साळवी, निर्माते शंकर पिसाळ, गायक राजेश धाऊस्कर, ध्वनी संयोजक संदेश गायकवाड, तालवादक दीपक गायकवाड तसेच पुरुष लावणी कलावंत चंद्रकांत तांबे यांचा गौरव करण्यात आला. राजा-राणी पुरस्कार श्री. व सौ. मयुरी–सुनील खंडागळे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लावणी कलावंत महासंघाचा वर्धापन दिन हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, लोककलेला प्रोत्साहन देणारा, कलाकारांना प्रेरणा देणारा आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक सोहळा असल्याचे सांगितले. गेल्या अकरा वर्षांपासून महासंघाने लोककला आणि लावणी क्षेत्रातील कलाकारांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे या सोहळ्याची कलाकार आणि रसिकांमध्ये दरवर्षी मोठी उत्सुकता असते.
कार्यक्रमास लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, अध्यक्षा कविता घडशी, सर्व पदाधिकारी, कलावंत आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

