डोंबिवली, दि. २० : कल्याण-डोंबिवली शहरात भगवान श्रीजगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेला रविवारी (१९ जुलै) भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय सोहळ्यात हजारो नागरिकांनी सहभागी होत भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांचे दर्शन घेत रथ खेचण्याचा पवित्र लाभ घेतला.
या रथयात्रेत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनीही सहभाग घेत भगवान श्रीजगन्नाथांच्या रथाची दोरी खेचत दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.
आमदार राजेश मोरे म्हणाले, "श्रीजगन्नाथ रथ खेचण्याचे भाग्य म्हणजे केवळ दोरीला हात लावणे नव्हे, तर प्रभूच्या कृपेची दोरी आपल्या जीवनाशी जोडण्याचा दिव्य क्षण असतो. जगन्नाथाचा रथ पुढे सरकतो, तेव्हा केवळ रथच पुढे जात नाही; तर श्रद्धा, सेवा, संस्कृती आणि समाजाला जोडणारी पवित्र परंपराही पुढे सरकत असते."
या भक्तिमय सोहळ्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ. हर्षाली थवील, कल्याण शहरप्रमुख रवी पाटील, सिटी इंजिनिअर अनिता परदेशी, तालुकाप्रमुख गजानन पाटील, बडूशेठ पाटील, राहुल गणपुले, प्रभाकर जाधव तसेच सतपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रथयात्रेदरम्यान शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत भगवान श्रीजगन्नाथांचा जयघोष केला. संपूर्ण परिसर "जय श्रीजगन्नाथ"च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या धार्मिक सोहळ्याने श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित नागरिकांना भक्ती आणि एकात्मतेचा संदेश दिला.
