वाढीव वीजबिल, वीजचोरीचे गुन्हे, नवीन मीटरसाठी होणारा त्रास आणि थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईवर तीव्र नाराजी; सुलभ हप्त्यांची योजना राबविण्याची मागणी.
कल्याण : कल्याण ग्रामीण परिसरातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना टोरेंट पॉवर कंपनीकडून होत असलेल्या कथित मनमानी कारभाराविरोधात आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी (२१ जुलै) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीला टोरेंट पॉवरचे जनरल मॅनेजर प्रवीण पांचाळ, असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश चंदण, मॅनेजर विकास अनुस्रे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेत वाढीव वीजबिल, पुरेशी चौकशी न करता वीजचोरीचे गुन्हे दाखल करणे, नवीन वीज मीटरसाठी वारंवार कागदपत्रांची मागणी करून नागरिकांना हेलपाटे मारायला लावणे तसेच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगाराप्रमाणे वागविणे तात्काळ बंद करावे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ चौकशी करून निरपराध नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
नवीन वीज मीटरसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्रास देऊ नये. आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास निर्धारित वेळेत मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.
थकबाकीदार शेतकरी व नागरिकांचा प्रश्नही बैठकीत प्राधान्याने मांडण्यात आला. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने एकरकमी थकबाकी भरणे शक्य नसते. त्यामुळे सुलभ हप्त्यांची योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा आणि वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या विषयावर यापूर्वी विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला असून टोरेंट पॉवर कंपनीकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.
बैठकीला उपतालुकाप्रमुख रोहिदास म्हात्रे, गणेश जयपाल, ओम लोके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

