घोंगडी बैठका, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण, डीम्ड कन्वेयन्स शिबिरे, एक खिडकी योजना आणि महसूल आपल्या दारीसह १५ विभागांच्या योजनांचा थेट लाभ
ठाणे,दि.22 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा’ आणि दि. ३० जुलै रोजी होणाऱ्या मुख्य विशेष कार्यक्रमाचा सविस्तर आढावा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत घेतला.
प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रसंगी उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक संजू चव्हाण हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, ठाणे जिल्ह्याची शहरी, ग्रामीण व आदिवासी अशी भौगोलिक रचना लक्षात घेऊन नागरिकांच्या गरजांनुसार थेट संवादावर भर दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील गावे व पाड्यांवर संध्याकाळच्या वेळी 'घोंगडी बैठका' आयोजित केल्या जातील. या बैठकीत तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी व रेशन व्यावसायिक प्रत्यक्ष जमिनीवर बसून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतील आणि विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देतील.
महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देताना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ७/१२ उताऱ्यावर वारस हक्काने महिलांची नावे लावणे, घरकुलांमध्ये संयुक्त मालकी नोंदवणे, आणि रेशन कार्डवर महिलेस कुटुंबप्रमुख म्हणून नाव नोंदवण्याची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. महिला बचत गटांना 'बँकर्स बँक ऑन स्पॉट'द्वारे तात्काळ कर्ज पुरवठा, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोंदणीसाठी डिजिटल साक्षरता स्टॉल, तसेच महिलांच्या आरोग्यासाठी मोफत कर्करोग व ॲनिमिया तपासणी शिबिरे आणि मोफत कायदेशीर समुपदेशन केंद्र उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शहरी व नागरी भागातील प्रलंबित प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी ठाणे, कल्याण व उल्हासनगर परिसरात 'मानवी अभिहस्तांतरण' (डीम्ड कन्वेयन्स) शिबिरे आयोजित करून गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, तर 'प्रलंबित फेरफार अदालत' भरवून प्रॉपर्टी कार्डवरील फेरफार व वारस नोंदींचा एकाच दिवशी निपटारा केला जाईल. तसेच शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या ग्रामीण व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटपाकरिता 'एक खिडकी' योजना, ७/१२ दुरुस्ती, ई-पीक पाहणी मार्गदर्शन आणि पाणंद व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
याशिवाय, शेतजमिनीचे वाद सोडवण्यासाठी 'सलोखा योजना', ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी 'महसूल आपल्या दारी' उपक्रम, स्मशानभूमी जागा निश्चिती, 'एक गाव एक वटवृक्ष', कातकरी (PVTG) व कुंभार समाजासाठी विशेष सवलती, आणि भात तसेच सुरण शेतीसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या सबसिडीसह आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. या तीन दिवसांच्या कालावधीत महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि मत्स्यव्यवसाय यासह तब्बल १५ विविध विभागांमार्फत हजारो लाभार्थ्यांना दाखले, सनद, आभा कार्ड, बँक कर्ज, आणि विविध योजनांचा थेट लाभ कॅम्पांच्या माध्यमातून वितरित केला जाईल, अशी संपूर्ण रूपरेषा डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

