Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

"नेहमी आनंदी राहा, आपल्या भाषेवर आणि पर्यावरणावर प्रेम करा" - कालिदास दिनानिमित्त भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शारदा मंदिर हायस्कूलमध्ये 'कालिदास दिन' उत्साहात; संस्कृत साहित्य आणि भारतीय संस्कृतीचा जागर

कल्याण | १५ जुलै : "महाकवी कालिदास यांच्या जीवनातून आणि साहित्यकृतीतून विद्यार्थ्यांनी तीन गोष्टी आत्मसात कराव्यात—नेहमी आनंदी राहा, आपल्या भाषेवर प्रेम करा आणि पर्यावरणावर प्रेम करा. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी किंवा परिसरात किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा," असे आवाहन भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.

आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच संस्कृत महाकवी कालिदास दिनानिमित्त कल्याण (पश्चिम) येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित 'कालिदास दिन' कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की, कल्याणमध्ये कालिदास दिन उत्साहात साजरी करणारी शारदा मंदिर हायस्कूल ही पहिली शाळा असल्याची माहिती मला मिळाली असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

आपल्या विद्यार्थी परिषदेतील कार्यकाळाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा, साहित्य आणि भारतीय संस्कृतीची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. तर संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, "संस्कृत ही सर्व भाषांची जननी मानली जाते. या भाषेचे संवर्धन करणे आणि तिचा अभिमान बाळगणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे." तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेवरही तितकेच प्रेम करावे आणि मराठी भाषेचा अभिमान जपावा, असे आवाहनही नरेंद्र पवार यांनी यावेळी केले.

यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तथा माजी मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांनी महाकवी कालिदास यांच्या 'मेघदूत' आणि 'अभिज्ञान शाकुंतल' यांसारख्या कालजयी साहित्यकृतींचा गौरव करत विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या जीवनावरील प्रेरणादायी प्रसंग सांगितला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्यावर आधारित नाट्यसादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना नरेंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्साह, संस्कृत भाषेबद्दलची आवड आणि शाळेचा उपक्रमशील दृष्टिकोन यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका अपर्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन भाग्यश्री ठाकूर, इंदुमती घाणे, पंढरीनाथ रोकडे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |