ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार ! - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार
उल्हासनगर ( शंकर जाधव ) : उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाचा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. सद्यस्थितीत असलेल्या उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारातच सुमारे ५०० खाटांचे क्षमता असलेले एक अत्याधुनिक रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. तर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिका आणि आरोग्य विभागाने जलद गतीने विकास आराखडा तयार करून तो वरिष्ठ पातळीवर पाठवावा अशा सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच कामगार रुग्णालयाची (ईएसआयसी ) नवी इमारत पूर्ण तयार आहे. रुग्णालयाची क्षमता १०० खाटांची आहे. मात्र या ठिकाणी इमारत प्रशस्त असल्याने याठिकाणी २५०-३०० खाटांची सेवा कशी देता येईल दृष्टीने नियोजन करावे. यासाठी इमारतीवर एक अतिरिक्त मजला देखील बांधण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आज उल्हासनगर शहरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी सर्वप्रथम उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयातील सर्व सुविधा यांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान आढळलेल्या तसेच काही सुधारणा याबाबत आरोग्य विभागाला तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देखील दिल्या. तसेच या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणतीही वैद्यकीय सेवा कमी पडू नये यासाठी रुग्णालयाने याची दक्षता घ्यावी. तर संपूर्ण रुग्णालयाचे ऑडिट करून आवश्यक गोष्टींच्या तरतूदीसाठी निधीची उपलब्धता देखील करून दिली जाईल असेही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या इमारतीमध्येच महिला रुग्णालय देखील सुरु करावे. यामुळे एकाच छताखाली सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध होतील. तर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तातडीने विकास आराखडा तयार करण्यात यावा.
मध्यवर्ती रुग्णालयात अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिटचे काम सुरू असून, भविष्यात या परिसरात वैद्यकीय शिक्षण, रुग्णालयांची संख्या आणि बेड क्षमतेत वाढ करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात सक्षम आणि सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्था उभी करणे हे आमचे उद्दिष्ट असून, येत्या काळात अधिक मजबूत आरोग्य यंत्रणा नागरिकांना मिळेल, असेही खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले.
उल्हासनगर हा प्रामुख्याने कामगार वर्ग मोठ्या संख्येने असलेला परिसर आहे. याच पार्श्वभूमीवर कामगार रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. याची क्षमता सध्या १०० बेड असून, ती आणखी वाढवून सुमारे २५० ते ३०० खाटांचे करण्यात यावे. यासाठी इमारतीवर एक मजला वाढविण्यात यावा. अशा सूचना यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. विशेष म्हणजे, या रुग्णालयात सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्मान भारत योजना' या दोन्ही योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांनाही मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात शहरातील हे कामगार रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. तसेच या ठिकाणी एमआरआय, सिटीस्कॅन, कॅथलॅब यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले अग्निशमन केंद्र, तीन शाळा आणि एक अभ्यासिकेचे यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केले.

