Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

गणेशोत्सवाची चाहूल; बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यात मूर्तीकार व्यस्त

नवी मुंबई | प्रतिनिधी : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून नवी मुंबईतील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या लगबगीचे वातावरण आहे. गौराई आणि श्रीगणेशाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम वेगाने सुरू असून रंगकाम, नक्षीकाम आणि आकर्षक सजावटीत मूर्तीकार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

जून महिन्यापासून सुरू झालेल्या मूर्ती निर्मितीच्या कामाला आता अंतिम टप्पा आला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत सर्व कच्च्या मूर्ती तयार करून त्या वाळवण्याचे काम पूर्ण करण्यावर कारखानदारांनी भर दिला आहे. सध्या कारखान्यांमध्ये मूर्तींना रंग देणे, सुबक आखणी करणे तसेच हिरे, मोती, लेस आणि ज्वेलरीच्या साहाय्याने आकर्षक सजावट करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, बाप्पाच्या डोळ्यांना अंतिम स्पर्श देताना मूर्तीकार अत्यंत एकाग्रतेने काम करताना दिसत आहेत.

दुसरीकडे, कारागिरांची कमतरता आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे कारखानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही गणेशोत्सवापूर्वी सर्व ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखान्यांमध्ये दिवस-रात्र काम सुरू आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने अनेक गणेशभक्तांनी आपल्या पसंतीच्या मूर्तींसाठी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यामुळे मूर्तीकारांवर वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आहे.

दरम्यान, वाढत्या महागाईचा परिणाम यंदा गणेशमूर्तींच्या किमतीवरही होणार आहे. शाडू मातीच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली असून रंग, सजावटीचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम गणेशभक्तांच्या खिशावर होणार आहे.

याबाबत गणेशभक्त अविनाश भरत पाटील यांनी सांगितले की, "माती आणि रंगसाहित्यासह इतर साहित्यांचे दर दरवर्षी वाढत असल्याने कारखानदारांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. शासनाने शाडू मातीचे दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून गणेशभक्तांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही."

कोपरखैरणे गावातील विक्रांत कला निकेतन गणपती कारखान्याचे मूर्तीकार संतोष चौलकर यांनी सांगितले की, शाडू मातीच्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात असून आता रंगकाम आणि आकर्षक सजावटीवर विशेष भर दिला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |