Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नागरिकांसाठी २९ शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई शहर जिल्ह्यात महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम; १९ स्टॉलद्वारे विविध सेवा उपलब्ध, १०९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

मुंबई | प्रतिनिधी : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत असून, या माध्यमातून नागरिकांना २९ शासकीय योजना व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविले जात असून शासनाच्या विविध योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत 'एकाच छताखाली' पोहोचविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

या शिबिरात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध महसुली दाखले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा, आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्डविषयक सेवा यांसह एकूण २९ शासकीय सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी १९ स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, धारावीतील कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या शिबिरात प्रातिनिधिक स्वरूपात १०९ लाभार्थ्यांना विविध योजनांची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

यावेळी मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी अजित नैराळे, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची गरज कमी होणार असून, शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |