Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

शिक्षण, समाजसेवा आणि भक्तीचा दीप विझला; शिळगावचे पोलीस पाटील संतोष भोईर यांचे निधन


शिक्षण, समाजसेवा, न्याय आणि वारकरी परंपरेसाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकनेत्याला देवशयनी एकादशीदिनी अखेरचा निरोप.

शिळगाव (ठाणे), दि. २५ : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिळगावचे पोलीस पाटील स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांचे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत दुःखद निधन झाले. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने शिळगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून समाजसेवा, शिक्षण, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यात कायम अग्रस्थानी राहणारा एक निस्वार्थी आधारवड काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिक्षणासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व

संतोष भोईर यांनी पोलीस पाटील म्हणून गावाची जबाबदारी सांभाळतानाच शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक ८१, शाळा क्रमांक २६ तसेच हाशा रामा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या खिचडी योजनेतील अडचणी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, शिक्षकांच्या समस्या तसेच शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि नव्या इमारतींच्या उभारणीसाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, हा त्यांचा कायमचा ध्यास होता.

अन्यायाविरोधातील निर्भीड आवाज

प्रेमळ, मनमिळावू आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या संतोष भोईर यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला. गावातील अनाधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी निर्भीड भूमिका घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

सरकारी महसूल जमीन, गावकीची जमीन, गुरचरण क्षेत्र तसेच सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. नागरिकांच्या हक्कासाठी त्यांनी नेहमीच प्रशासनाशी संघर्ष केला.

वीज, वाहतूक आणि नागरी प्रश्नांसाठी सातत्याने लढा

टोरंट पॉवर कंपनीच्या वाढीव वीजबिलांविरोधात त्यांनी आवाज उठवला. नागरिकांचा वीजपुरवठा खंडित होणे, सार्वजनिक सुविधा, वाहतूक कोंडी यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

दक्ष नागरिक संघटनेच्या माध्यमातून शिळगाव-कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही त्यांनी अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

सामाजिक आणि धार्मिक कार्यात कायम अग्रेसर

पोलीस पाटील पदासोबतच ते पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. परमपूज्य स्वामी डी. के. दास महाराज सिताराम प्रतिष्ठानचे सदस्य, जय भवानी तरुण मित्र मंडळाचे सदस्य तसेच श्री खरवली सेवा ट्रस्टचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी समाजकार्यात मोठे योगदान दिले.

गावातील नवरात्रोत्सव, वारकरी संप्रदायाचा हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आज शिळगावात सलग तीन दिवसांचा आयोजित होणारा हरिनाम सप्ताह सुरू करण्याचे श्रेयही संतोष भोईर यांनाच जाते. या धार्मिक परंपरेला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

न्यायप्रिय आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व

संतोष भोईर यांची निर्णय घेण्याची पद्धत सर्वांसाठी आदर्श मानली जात होती. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, दोन्ही बाजू समजून घेऊन न्याय्य निर्णय देण्याची भूमिका आणि सर्वसामान्यांशी असलेले आत्मीय संबंध यामुळे त्यांनी समाजात विशेष विश्वास संपादन केला होता.

शिळगावने गमावला खरा हितचिंतक

त्यांच्या निधनामुळे शिळगावने केवळ एक पोलीस पाटील गमावलेला नाही, तर शिक्षण, समाजकारण, धर्मकार्य आणि जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर झटणारा एक कर्तृत्ववान समाजसेवक गमावला आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |