Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दिवा विभागातील नालेसफाईतील भ्रष्टाचार उघड; सर्वाधिक ₹७.३५ लाखांचा दंड, स्वतंत्र चौकशीची मागणी

निकृष्ट कामांमुळे नागरिकांचे हाल; संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी – ॲड. रोहिदास मुंडे

दिवा ( प्रतिनिधी ): ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई कामांमधील गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून, संपूर्ण ठाणे शहरातील विविध प्रभागांतील ठेकेदारांवर एकूण ₹२८.३६ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामध्ये दिवा विभागातील ठेकेदारावर सर्वाधिक ₹७.३५ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याने या विभागातील कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, हा प्रकार दिवा विभागातील प्रशासनाच्या अपयशाचा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, दिवा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होतात. नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतानाही प्रत्यक्षात कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी केवळ दंड आकारून जबाबदारी संपत नाही, असे स्पष्ट करत मुंडे यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि कामाची देखरेख करणाऱ्या यंत्रणेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दिवा विभागावर सर्वाधिक दंड आकारला जाणे हे येथील नागरिकांवर झालेल्या अन्यायाचे द्योतक असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली.

यावेळी ॲड. रोहिदास मुंडे यांनी इशारा देत सांगितले की, दिवा येथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू. आवश्यकता भासल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनही करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |