Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर नागरिकांना प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अतिमुसळधार पाऊस व ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा; धबधबे, गड-किल्ले, धरणे, तलाव, नद्या आदी ठिकाणी जाण्यास मनाई

ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी करून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर नागरिकांना पुढील आदेश होईपर्यंत जाण्यास प्रवेशबंदी लागू केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी, तसेच ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे पडणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.

पावसाळ्यात धबधबे, गड-किल्ले, धरणे, तलाव, नद्या आणि इतर पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र अशा ठिकाणी दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे, बुडण्याच्या घटना आणि घसरून अपघात होण्याचा धोका लक्षात घेता ही बंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने संबंधित शासकीय विभागांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि बंदी असलेल्या पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |