ऐरोली, महापे व परिसरातून १ विषारी मण्यार आणि ४ धामण सर्पांचे सुरक्षित रेस्क्यू; घणसोली-महापे येथील गवळी देव पक्षी अभयारण्यात सोडले
नवी मुंबई | प्रतिनिधी : नवी मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदर्शनाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुरुवार (३ जुलै) रोजी सर्पमित्र सुरेश मल्हारी खरात यांनी एकाच दिवशी पाच सर्पांचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना जीवदान दिले. या धाडसी कामगिरीमुळे संभाव्य धोका टळला असून नागरिकांनीही सर्प दिसल्यास घाबरून न जाता तज्ज्ञ सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल परिसरात धामण जातीचा सर्प आढळल्याची माहिती मिळताच सुरेश खरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्पाला सुरक्षित पकडले. त्यानंतर ऐरोली, महापे आणि इतर भागांतील विविध ठिकाणी पोहोचून आणखी एक विषारी मण्यार (कॉमन करैत) आणि चार धामण जातीचे सर्प शिताफीने पकडले.
पावसाळ्यात सर्प मानवी वस्त्यांकडे येण्याचे प्रमाण वाढते. अनेक नागरिक प्रत्येक सापाला नाग (कोब्रा) समजतात; मात्र भारतातील सर्वाधिक विषारी सापांमध्ये मण्यार (कॉमन करैत) हा अत्यंत धोकादायक मानला जातो. या सापाचा दंश अनेकदा वेदनारहित असल्याने विष शरीरात झपाट्याने पसरू शकते. मण्यार हा साप प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो आणि शेत, गाव तसेच घरांच्या परिसरात आढळून येतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रेस्क्यू करण्यात आलेले सर्व सर्प कोणतीही इजा न करता घणसोली-महापे येथील गवळी देव पक्षी अभयारण्यात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबतची माहिती अविनाश भरत पाटील यांनी दिली.
सर्प हा पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून उंदीर व इतर कीटकांचे नियंत्रण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे सर्प दिसल्यास त्यांना मारण्याऐवजी तातडीने प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

