नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी कायम; सरकारविरोधात रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा निर्धार
पनवेल | प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमटणे (पनवेल) येथील २३ वर्षीय भूमिकन्या रश्मिता पोपेटा यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आमदार रोहित पवार यांच्या विनंतीनंतर मागे घेण्यात आले. उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
रुग्णालयात भेट देऊन आमदार रोहित पवार यांनी रश्मिता पोपेटा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आगरी, कोळी, कराडी, ओबीसी समाज तसेच बारा बलुतेदारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्व. दि. बा. पाटील यांचे कार्य अत्यंत मोठे असून त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याची मागणी रास्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्यासाठी आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. "तुमच्यासारख्या युवक-युवतींच्या साथीने आपण हा लढा अधिक तीव्र करू. सरकारला जनतेच्या ताकदीपुढे झुकावे लागेल. या संघर्षात मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे," असा विश्वास देत त्यांनी रश्मिता पोपेटा यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
आमदार रोहित पवार यांच्या विनंतीचा मान राखत रश्मिता पोपेटा यांनी पाणी ग्रहण करून आपले बेमुदत उपोषण सोडले. मात्र, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी कायम राहणार असून, यासाठी पुढील काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, डॉ. मंगेश आमले, निलेश पाटील, शहबाज पटेल, अक्षय बोराडे, राजू देशमुख, विकास बिराजदार, ललित साळुंखे, अभय पिसाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

