मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या इशाऱ्यामुळे खबरदारीचा निर्णय; अंगणवाड्यांसह सर्व शैक्षणिक संस्था राहणार बंद
ठाणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. हवामान विभागाने ७ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षण विभाग तसेच संबंधित यंत्रणांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

