Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायांसाठी संयुक्त पाहणी

आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभाग, आयआरबी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-शिळ रोड, शिळफाटा, मुंब्रा-दहिसर आणि १४ गाव परिसरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. वाहतूक विभागाचे डीसीपी संजय शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राजेश मोरे यांनी या दौऱ्याचे नेतृत्व केले.

या पाहणीमध्ये आयआरबी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एमआयडीसी तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे, अडथळे आणि त्यावरील तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.

पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण अपूर्ण असल्याने 'बॉटलनेक' निर्माण झाले आहेत, तेथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे आरसीसी व मॅस्टिक डांबर तंत्रज्ञानाद्वारे कायमस्वरूपी दुरुस्त करणे, राँग साईड वाहनचालना रोखण्यासाठी अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करणे, आवश्यक चौकांमध्ये नवीन वाहतूक सिग्नल बसविणे तसेच अनधिकृतपणे तोडण्यात आलेले रस्ता दुभाजक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय रस्त्यालगत होणाऱ्या अनधिकृत वाहन पार्किंगवर कठोर कारवाई, वाहतुकीस अडथळा ठरणारे वीज खांब व विद्युत रोहित्रांचे स्थलांतर तसेच सर्व विभागांच्या समन्वयातून टप्प्याटप्प्याने कृती आराखडा राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी आयआरबीचे जनरल मॅनेजर महेश जोशी, सचिव प्रभारी सचिन दवे, एमएसआरडीसीचे अनिल शर्मा, ठाणे महानगरपालिकेचे सचिन कदम, आदित्य डावखर, कार्यकारी अभियंता अर्जुन अव्हाड, एमआयडीसीचे कनिष्ठ अभियंता एन. एस. नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद चव्हाण तसेच सचिन भालेराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील, उपतालुकाप्रमुख गणेश जयपाल तसेच भरत भोईर, मुकेश पाटील, नकुल गायकर, गणेश मुंडे आणि संतोष वालीलकर यांनीही या पाहणी दौऱ्यात सहभागी होत स्थानिक नागरिकांच्या समस्या व सूचना अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

यावेळी वाहतूक कोंडी हा केवळ प्रवासाचा प्रश्न नसून नागरिकांचा वेळ, इंधन, आर्थिक संसाधने आणि आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषय असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे तात्पुरत्या उपायांबरोबरच नियोजनबद्ध व कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारून नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |