प्रभागातील विविध नागरी समस्यांवर महापालिका आयुक्तांसोबत भाजपा शिष्टमंडळाची बैठक; धूर फवारणी वाढविणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी
डोंबिवली (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक २९ मधील विविध नागरी समस्यांबाबत आज महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर ॲड. हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले तसेच भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर सविस्तर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता प्रभागात नियमित आणि प्रभावी धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या १२ नगरसेवकांसाठी केवळ ४ धूर फवारणी यंत्रे उपलब्ध असून आवश्यक मनुष्यबळाचीही कमतरता असल्याने धूर फवारणीचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. यासाठी धूर फवारणी यंत्रांची संख्या वाढविणे तसेच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय प्रभागातील विविध भागांमध्ये वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्याचा मुद्दाही बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विशेषतः डास नियंत्रणासाठी धूर फवारणी अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यंत्रसामग्री व मनुष्यबळ वाढविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमानुसार कारवाई करून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस भाजपा महिला प्रदेश सचिव रेखाताई चौधरी, नगरसेविका रसिका कृष्णा पाटील, कृष्णा पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या ॲड. सौ. कविता मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले की, प्रभागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेवर मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

