Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : नवी मुंबईतील नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्यूएन्स नोटीफाईड एरिया) क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी. तसेच मंजूर असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता कार्डांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिडको-नैना अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून नैना क्षेत्रातील नगर रचना योजना प्रलंबित आहेत. मंजूर केलेल्या योजनांमध्ये त्रुटी असल्याचे नागरिक व लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष स्थळावर जाऊन सर्वेक्षण करून त्रुटी दूर कराव्यात. तसेच जमीन मोजणीसाठी आता शासनाने खासगी यंत्रणांना मंजुरी दिली आहे. त्यांच्या मार्फत या क्षेत्रातील जमिनींची मोजणी करावी. नैना क्षेत्रातील तसेच विविध महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, वाहतूक, पार्किंग, रस्ते, विकास आराखडा आणि पायाभूत सुविधांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरात लवकर नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांना मंजुरी देण्याची सूचना केली. आवश्यक असल्यास मनुष्यबळ वाढवावे. गावकऱ्यांना पात्रतेनुसार जमिनीचे वाटप करून पारदर्शकता ठेवावी. तसेच नैना क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर शहरे आणि प्रकल्प उभे राहणार असतील, तर त्यासाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. कोंढाणे, केटवणे, बाळगंगा आदी जलस्रोतांचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |